(बीड/प्रतिनिधी) जिल्ह्यात खरीप हंगाम २०२० सुरु झाला असून सर्वत्र पेरणी योग्य पाऊस झाला आहे. या हंगामामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयबीनची पेरणी केलेली आहे परंतु सोयाबीन बियाणे उगवणीबाबत तक्रारी येत आहेत. तरी ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवणी बाबत तक्रार असेल अशा सर्व शेतकऱ्यांनी त्यांची लेखी तक्रार संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांचेमार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचेकडे सादर करावी. सोबत आपल्या बिलाची साक्षांकित प्रत अर्जासोबत कार्यालयात जमा करावी. अशा प्राप्त तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल याची नोंद सर्व शेतकऱ्यानी घ्यावी. त्यामुळे कोणीही कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल अशा प्रकारचे कृत्य करू नये. दोषी आढळलेल्या बियाणे कंपनी तसेच इतर दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्याना न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तरी अजूनही ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन योग्य उगवण क्षमता तपासूनच व बीज प्रक्रिया करून पेरणी करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,बीड यांनी केले आहे.