जुन्नर(२४ मे) :- सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग धंदे बंद पडले आहेत, शेत माल विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नाही, रोजंदारी बंद झाली आहे अजूनही किती दिवस वरील सर्व गोष्टी बंद राहतील हे कोणीही सांगू शकत नाही.अशा परिस्थितीत आपल्या सारख्या सामान्य नागरिकांनी व गरीब मजुरांनी काय करावे हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला आहे. आणि म्हणून आपल्याला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकारने रोजगार हमी योजना सुरू केली आहे यामध्ये आपण कामाची मागणी केल्यावर १५ दिवसांत आपल्याला काम उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायत ची जबाबदारी आहे.
म्हणून या योजनेचा लाभ प्रत्येकाने घेण्याचे आवाहन अखिल भारतीय किसान सभेने केले आहे, ज्यामुळे आपल्याला रोजगार तर मिळेलच त्यासोबतच गावातील विकास कामेही वाढण्यास मदत होईल. म्हणूनच आपण या योजनेचा लाभ घेऊन आपल्या गावातच काम मिळवून रोजगार प्राप्त करू शकतो. या संदर्भात अखिल भारतीय किसान सभेने झूम च्या माध्यमातून बैठक घेतली होती त्यामध्ये मनरेगा या योजनेवर चर्चा करण्यात आली त्यावेळी किसान सभेचे जिल्हा सचिव डॉ. अमोल वाघमारे, किसान सभा तालुका अध्यक्ष डॉ. मंगेश मांडवे, किसान सभा जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, किसान सभा तालुका सचिव लक्ष्मण जोशी यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यासाठी आपल्याकडे खालील गोष्टींची आवश्यकता आहे.
१)मजुरांचे वय हे १८ ते ६० असावे.
२)मजुराकडे जॉबकार्ड उपलब्ध असणे आवश्यक आहे.
३)राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
४)ग्रामपंचायत देईल ते काम करण्याची इच्छा असावी.
वरील सर्व गोष्टींस पात्र असणारे कोणीही व्यक्ती काम मागणी करू शकतो.