Wednesday, May 22, 2024
Homeकृषीटॉमेटो पिकावरील विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर किसान सभेने केल्या ह्या मागण्या

टॉमेटो पिकावरील विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर किसान सभेने केल्या ह्या मागण्या

मुंबई(२४ मे) :- महाराष्ट्रात टॉमेटो उत्पादक पट्ट्यात टोमॅटोची फळे मोठया प्रमाणात झाडावर खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. टॉमेटो पिकावरील विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर किसान सभेने खालील मागण्या केलेल्या आहेत.

* टोमॅटोची फळे व झाडे कशामुळे बाधित होत आहेत या बाबतचे निदान करून यावर उपचाराबाबत राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन उपलब्ध व्हावे.

* टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. सरकारने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना यानुसार आर्थिक साहाय्य करावे.

* टॉमेटो, भाज्या व फळ भाज्या या सारख्या सर्व नाशवंत पिकांना नैसर्गिक आपत्ती, रोगराई व दरा बाबतचे चढउतार या पासून संरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने यासाठी विमा योजना सुरू करावी. 

* राज्याच्या कृषी विभागाने या पार्श्वभूमीवर टोमॅटोचे नमुने घेतले. बेंगलोर येथील शासकीय प्रयोगशाळेत ते तपासणीसाठी पाठविले. मात्र अद्याप या बाबतचे निष्कर्ष शेतकऱ्यांना समजलेले नाहीत. 

* टॉमेटो पिकाच्या या नुकसानीला बियाणांमधील दोष कारणीभूत आहे काय या अंगाने चौकशी होण्याची आवश्यकता आहे. कृषी विभागामार्फत बियाणांची सॅम्पल्स IIHR बेंगलोर येथे पाठविण्यात आले आहेत. लवकरात लवकर या बाबतचा रिपोर्ट प्राप्त होणे आवश्यक आहे.

संसर्गाचे साथीत रूपांतर झाले असल्याने पुढील टॉमेटो पीक हंगाम धोक्यात आला आहे. नवीन पीक घेताना कोणते बियाणे वापरावे तथा काय प्रतिबंधात्मक उपाय करावे याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना होण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या वरील शंकाही दूर होणे आवश्यक आहे.

शिवाय ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सरकारच्या वतीने या दृष्टीने पावले उचलावीत अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय