Friday, May 10, 2024
Homeग्रामीणभाषण,भास आणि आत्मनिर्भर भारतातील भूक

भाषण,भास आणि आत्मनिर्भर भारतातील भूक

             शहाजहानने ताजमहाल बांधल्यानंतर कामगारांचे हात छाटून टाकले अशा दन्तकथा मोठ्या चवीने आजही चघळल्या जातात. शहाजहानने असं काही केलं की नाही हे कोणी खात्रीशीर सांगू शकत नाही. त्याला  कोणताच पुरावा नाही. मात्र अशा हुकूमशाही प्रवृत्ती नेहमीच मानवी कल्पनांना अस्तित्व देऊन तिला वास्तवात जन्माला घालनाऱ्यांचे आधी हात छाटतात, त्यांच्या सृजनाच्या कल्पना त्यांच्यापासून हिसकवतात. त्यांची ताटातूट होते निर्माणाच्या आंनदापासून. व्यवस्थेला ना त्यांच्या जगण्याशी घेणंदेण असतं ना त्यांच्या मृत्यूचं सुतक. त्यांनी त्यांचा उभा जन्म या शोषित व्यवस्थांच्या सेवांसाठी खर्च करावा आणि या नफाधारीत व्यवस्थांनी त्यांचं रक्त पिऊन स्वतःला फुलवाव असंच तर सुरू आहे किती काळापासून. त्यांचं रक्त संपलं की देतात फेकून या मानवी शरीराच्या लक्तरांना मरण्यासाठी, कुजण्यासाठी बेवारशी घोषित करून. *मानवी कल्पनांचं वास्तव बनवणाऱ्या, मेंदूच्या कप्यातुन स्फुरलेल्या स्वप्ननांना, अपरिमित मेहनतीने सत्यात उतरवनाऱ्या, कल्पनेहुन सुंदर, रम्य सत्य तुमच्या आमच्यासाठी घडवणाऱ्या निर्मिकांची उपेक्षा किती काळापासून होतं आलेली आहे.

            लॉकडावूनमध्ये ती विदारकता अजून भयावह झाली आहे. हे नुसते श्रमिक नाहीत निर्माणकर्ते आहेत, सजीवसृष्टीचा निर्माता जसा निसर्ग, तसा या मानवी वस्तीत आकाराला आलेल्या तमाम मानवनिर्मित वस्तूंचा, वास्तूंचा करता करविता हा कामगार आहे. आपले रक्त आणि घाम आटवून त्याने सजीवसृष्टीप्रमाणे मानवीदृष्टीतुन एक प्रचंड मोठी सृष्टी वसवली आहे या पृथ्वीतलावर. रस्ते, इमारती, यंत्र,तंत्र, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग व्यवसाय या साऱ्यांची भरभराट या कामगारांच्या घामाने झाली आहे.

          डांबरी गुळगुळीत रस्ते, पॉश गाड्या आणि माड्या, आकाशात भरारी घेणारी विमाने, सागरात तरंगणारी जहाजे, अवजड यंत्र ते नॅनो टेक्नॉलॉजी, चित्रपट, मालिका, मनोरंजन,  खेळ,  वैदकीय सेवा, लोभस पर्यटन, कचरा वाहणाऱ्या घंटागाड्या,  सांडपाणी वाहणाऱ्या काळ्याशार गटारी, लेकरांचे बगीचे, हॉटेलमधील चमचमीत पदार्थ, कोल्डकॉफी, कटिंग चहा किंवा थंडगार बियर, वेळेत मिळणारी होम डिलिव्हरी, फास्ट फूड, खाऊ गल्ल्या, हिरव्या भाज्या, रसरशीत फळे या सर्वांच्या निर्मितीमागे या निर्माणकर्त्यांची मेहनत आहे. त्यांचा हात जिथे फिरतो तिथं नवंनिर्माण होतं, सृजन फुलतं. वाळवंटात मग गुलाबी शहर वसतं, तर यमुनाकाठी संगमरवरी ताजमहाल. इतकंच काय गडगंज संपत्तीचे धनी, जगातील श्रीमंतांच्या यादीत नाव असनारे अब्जाधीश या देशात आहेत ते याच श्रमिकांमुळे. गरज ते चैन यांच्यामध्ये जे जे मानवाने निर्माण केलंय त्या सर्वांमध्ये त्यांचा घाम आहे, रक्त आहे, त्यांची भूक आहे त्यांचे अश्रू आहेत. पण ही व्यवस्था तुम्हा आम्हाला ते दिसू देत नाही.

               काय होतं माणसाकडे जेव्हा तो शहाणा माणूस झाला, होमो सेपीअन झाला. ओबडधोबड दगडी हत्यारं होती फक्त. इतकं लांब पण जायची गरज नाही. त्रेहात्तर वर्षापूर्वी हा देश गुलामगीरीतुन मुक्त झाला तेव्हा साम्राज्यवाद्यांनी त्याला कंगाल करून टाकलं होतं. फाळणीचा जीवघेणा घाव दिला होता. अडाणी,दारिद्र्याने गांजलेली जनता, उजाड भूखंड, आणि सार्वभौमत्व एवढंच भांडवल होतं देशाकडे. तेवढ्यातून पुढे इथं मोठे मोठे विकासप्रकल्प उभे राहिले, भाकरा नांगल सारखे मोठे जलाशय, धरणे, महामार्ग आणि लोहमार्गांचे जाळे, विमानतळ, वीज, कोळसा, अणुऊर्जा प्रकल्प, दळणवळण, खाणी, शेती, कारखाने, उद्योग, सिनेसृष्टी, खेळ, हे सगळं बहरत गेलं. ते फक्त सत्तेमुळं नाही तर तर या श्रमिकांच्या घामामुळे. किती पंचवार्षिक आल्या नी गेल्या, सालाबादप्रमाणे मांडले जाणारे बजेट, विविध धोरणं, असंख्य योजना निव्वळ कागद ठरले असते ना त्यांच्या राबण्याशिवाय. त्यांच्या श्रमाने या कागदांवरील कल्पनांना अर्थ दिला त्यांना आकार दिला, रूप दिले, ओळख दिली, मुख्य म्हणजे अस्तित्व दिले. विचार करा अस्तित्वात नसलेल्या गोष्टींना वास्तवात साकार करणारे त्यांचे श्रम खरं तर किती सन्मानपात्र असायला हवे होते. एका कागदावर रस्त्याचा आराखडा बनतो फक्त कल्पना असते ती. हे निर्माणकर्ते त्यात आपले शारीरिक, बौद्धिक श्रम ओततात, दिवसरात्र त्या कल्पना पूर्ण करण्यासाठी झटतात आणि बघता बघता रस्ता तयार होतो. त्यावर गाड्या धावू लागतात. अशा अगणित कल्पनांमध्ये त्यांनी श्रम उपसून प्राण फुंकले आणि त्या कल्पना जीवंत झाल्या. कल्पनांच्या विश्वाची सृष्टी उभारणाऱ्या या किमयागारांना मात्र फक्त वापरलं गेलं. एकदा का त्या कल्पना निर्माण झाल्या की या निर्मात्यांची तिथून हकालपट्टी ठरलेली. 

                                             कोणाच्या मेंदुतून भन्नाट तंत्रज्ञानाचे अंकुर फुटतात, त्याला वाटत असेल ना या अंकुराच रोपटं करावं, पण नफेखोर कंपन्या त्याची ती कल्पना शुल्लक किंमतीत हिरावून घेतात आणि पुढे या कल्पनेचा बाजार भरवून नफा उफसतात. तिचा निर्माता उपेक्षितच रहातो कायमचा. नफेखोरी पुढे जीवनाला कवडीमोल मानणाऱ्या व्यवस्थांना या किमयागारांच्या सुखदुःखाशी संवेदना असण्याचा प्रश्नच उरत नाही. नफा हाच सर्वोच्य असल्याने तिथे माणसाचे माणसाची समता, बंधुतेवर आधारित नाते असूच शकत नाही. शोषणाने नफा मिळत असल्याने श्रमिकांचे स्वातंत्र्य या व्यवस्था मान्य कशा करणार? तिथं स्वार्थ हेच उघडेनागडे वास्तव असणार ना. नफा आणि स्वार्थ या मूल्यांवर उभ्या असणाऱ्या या सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्था श्रमिकांच्या जीवनाची कदर करूच शकत नाही. उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या कच्चा माल, यंत्र यांसारख्या सामुग्रीप्रमाणे हे श्रमिकही त्यांच्यासाठी एक सामुग्रीचाच प्रकार. यंत्र खराब झालं तर दुसर मिळतं, तसेच हे कामगार पण थोडे फार मेले तर दुसरे मिळतातच की. बेरोजगार, एकवेळच्या भाकरीसाठी वाटेल ते करायला तयार असणाऱ्या लोकांची खान आहे हा देश. तिथं जीवनाची किंमत ती काय. दोन तीन लाख जीवमागे घोषित केलं की संपलं. त्या जीवाचं जीव असणं, त्याची स्वप्न त्याची नाती त्याच माणूस असणं सारंच संपत. भांडवलशाहित सगळ्याची किंमत असते, जगण्याची, मरण्याची, मारण्याची. सगळं खरेदी करता येतं, भावना, नीतीमूल्य, हक्क या गोष्टी अर्थहीन असतात फक्त किंमतीचा बाजार असतो. 

               या सगळ्याची प्रचिती लॉकडाऊनमध्ये येत आहे. ज्यांनी रस्ते बनवले ते रस्ते त्यांना घरी घेऊन जाऊ शकत नाही. ज्यांनी देश घडवला त्यांच्यासाठी देश काही करू शकत नाही. ज्या शाळांमध्ये माणसाला माणूसपण दिलं जातं शिक्षणातून त्या शाळा आज माणसं कोंडवण्याच्या कोंडवाडे बनल्या आहेत. चुली विझल्या बऱ्याच, काही विझत आहेत. चालून चालून चालणार किती पावले थकत आहेत. 

             सत्तेने हेडफोन टाकलेत कानात आत्मनिर्भरतेचं गाणं तिथं वाजत आहे. झोपडपट्टीत, गावात, आणि आता गावकुसाबाहेर झुंडीने काँरन्टीन झालेला आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहचण्याचा सवालच नाही. किती छान झालं असत ना नुसती कल्पना करून पोटातील भुकेचा खड्डा भरण्यासाठीही एखादी काँरन्टीन स्पेशल रेसिपी दूरदर्शनवर रोज सुरू केली असती सरकारने तर. रेशन आणि रोजगाराची चिंताचं उरली नसती. भाषण आणि भासाच्या मोहजाळात कोणी सांगावं खरोखर आपण आत्मनिर्भर पण होऊन गेलो असतो.

रोहिणी नवले,भंडारदरा

 ७०३००३११२४

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय