Thursday, May 2, 2024
Homeराज्यमोठी बातमी : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

मोठी बातमी : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

गडचिरोली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शितल आमटे यांनी विषाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असल्याचे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.

नैराश्याच्या भरात वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ, ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांच्या कन्या डॉक्टर शीतल आमटे – करजगी यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. 

शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला होता. शीतल आमटे या सर्व वादाच्या केंद्रस्थानी होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले आहे. त्या मानसिक तणावात असल्याचे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले होते.

शीतल आमटे यांनी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. पण तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉ. शितल ह्यांचा मृत्यु झाल्याचं घोषित केलं.

काही दिवसांपूर्वी आल्या होत्या चर्चेत

काही दिवसांपूर्वी डॉ. शीतल आमटे – करजगी या चर्चेत आल्या होत्या. त्यांनी 20 नोव्हेंबर 2020 ला फेसबुक लाईव्ह करून महारोगी सेवा समितीकडून केल्या जाणाऱ्या कामावर आणि विश्वस्तांवर काही आक्षेप घेतले होते. या लाइव्हमध्ये त्यांनी कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही काही आरोप केले होते. नंतर अर्ध्या तासाचं ते फेसबुकवरील लाईव्ह संभाषण डॉ. शीतल यांनी डिलिट केले होते.

 

या फेसबुक लाइव्हनंतर आमटे कुटुंबीयांनी एक पत्रक काढून डॉ. शीतल आमटे यांच्या वक्तव्यांचा निषेध केला होता. त्यांचं सर्व भाष्य हे तत्थ्यहीन असून कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे संयुक्त निवेदन जाहीर करत असल्याचं आमटे कुटुंबीयांनी सांगितलं. त्या नैराश्याविरोधात लढत होत्या असंही त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं होतं. 

या निवेदनावर डॉ. शीतल आमटे – करजगी यांचे आई वडील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन चालविणारे डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे यांनी तसंच गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसामध्ये आदिवासींसाठी काम करणारे डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सह्या केल्या होत्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय