Friday, May 3, 2024
Homeराज्यअंगणवाडी कर्मचारी व आशा, गटप्रवर्तकांच्या समर्थनार्थ कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती...

अंगणवाडी कर्मचारी व आशा, गटप्रवर्तकांच्या समर्थनार्थ कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती मैदानात; राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

मुंबई : अंगणवाडी कर्मचारी व आशा, गटप्रवर्तकांच्या संपाच्या समर्थनार्थ कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती मैदानात उतरली आहे. अंगणवाडी कर्मचारी व आशा, गटप्रवर्तक यांच्या संपाला कृतीशील पाठिंबा देण्यासाठी २९ जानेवारी रोजी कामगार कर्मचारी कृती समिती आझाद मैदानावर आंदोलन करणार, तसेच राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती चे प्रमुख समन्वयक डॉ. डी. एल. कराड, समन्वयक एम. ए. पाटील, साथी निवृत्ती धुमाळ, राजु देसले यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

अंगणवाडी कर्मचारी आपल्या मानधन वाढ, पेन्शन, ग्रॅच्युइटी, अंगणवाडी भाडेवाढ व आहाराच्या दरात वाढ या न्याय्य मागण्यांसाठी ४ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संपावर उतरलेल्या आहेत. आशा व गटप्रवर्तकांचा १२ जानेवारी पासून मानधनवाढीचा जीआर काढावा या महत्त्वाच्या मागणीसाठी संप सुरू झाला आहे. 

राज्यातील जवळ जवळ ३ लाख कष्टकरी महिलांनी आपल्या हक्कासाठी संप केला आहे. त्या देत असलेल्या आरोग्य, पोषण व शिक्षण विषयक मूलभूत सेवा ठप्प झाल्यामुळे लाखो लाभार्थींवर परिणाम होत आहे. तरी देखील शासन निर्णय घ्यायला तयार नाही ही गोष्ट गंभीर आहे. या संपावर समाधानकारक तोडगा निघावा म्हणून कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने पुढाकार घ्यावा असा निर्णय होऊन या संपाला पाठिंबा देण्यासाठी कृती समितीने सोमवार दिनांक २९ जानेवारी रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात तमाम कामगार कर्मचारी वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृती समिती करत आहे. २९ जानेवारी रोजी मुंबई प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी व आशा गटप्रवर्तकांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी कृती कार्यक्रम आयोजित करावेत असे आवाहन राज्य कृती समितीने केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय