केरळ : एखाद्या सिनेमाच्या कथेला लाजवेल अशी एक प्रेम कथा नुकतीच केरळमधून समोर आली आहे. केरळमधील पलक्कड येथून दहा वर्षांपूर्वी एक मुलगी बेपत्ता झाली असल्याची माहिती संपूर्ण गावाला माहीत होती, परंतु ही मुलगी आपल्या प्रियकराच्या घरात राहत असल्याची माहिती दोघांच्याही कुटुंबाला जराही नव्हती. ही मुलगी आपल्या प्रियकरासोबत तब्बल दहा वर्षे एका खोलीत राहत होती. रहमान आणि साजिता असं या जोडप्याचं नाव आहे.
केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील अईलूर या गावातील ही घटना आहे. १० वर्षांपूर्वी जेव्हा दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा ती मुलगी १८ आणि मुलगा २४ वर्षांचा होता. आज मुलगी २८ वर्षांची आहे आणि मुलगा ३४ वर्षांचा आहे. मुलाचे घरदेखील मुलीच्या घरापासून फक्त ५०० मीटर अंतरावर होते. तरीही मुलगी प्रियकराच्या घरात लपून बसलीय याची कुणालाही भनक लागू शकली नाही.
गेल्या दहा वर्षांपासून साजिता ही रहमानच्या घरी, त्याच्या खोलीत राहत होती. रहमानची खोली ही दिवसभर बंद असायची. साजिताला ज्या काही वस्तू लागायच्या त्या रहमान तिला आणून द्यायचा.
तीन महिन्यांपूर्वी मुलीचा प्रियकरही बेपत्ता झाल्यावर या प्रकरणाचा तपास पुन्हा करण्यात आला. त्याच्या भावाने जेव्हा त्याला पाहिले तेव्हा त्या दोघांचा शोध लागला त्यावेळी नेमारागावच्या जवळ असणाऱ्या विथानसेरी या गावात ते राहत असल्याचे समोर आले.
दरम्यान, दोघेही गायब असल्याच्या तक्रारी दाखल असल्याने पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केलं त्यावेळी न्यायालयाने तडजोड म्हणून या दोघांचे लग्न लावण्याचा सल्ला दिला.