नवी दिल्ली : AltNews चे सह-संस्थापक आणि पत्रकार मोहम्मद जुबेर यांना सोमवारी दिल्ली पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक केली आहे. मोहम्मद जुबेर यांच्या विरुद्ध भादंवि कलम १५३/२९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून काल त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
AltNews सह-संस्थापक प्रतीक सिन्हा यांनी सांगितले की, मोहम्मद जुबेर यांना दिल्ली पोलिसांनी दुसऱ्या एका प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते, परंतु ही अटक दुसऱ्या प्रकरणात झाली आहे. अनिवार्य नोटीस दिली नसल्याचा आरोप सिन्हा यांनी केला. त्यांनी ट्विट केले की, ‘वारंवार विनंती करूनही आम्हाला एफआयआरची प्रत दिली जात नाही.’
जुबेर यांच्या विरोधात पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. काल 1 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आज पुन्हा त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणार आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांना एका ट्विटर हँडलवरून तक्रार मिळाली होती, ज्यामध्ये मोहम्मद जुबेर यांनी आक्षेपार्ह फोटो ट्विट करून जाणूनबुजून एका धर्माच्या देवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारीत म्हटले आहे की, हे ट्विट सतत रिट्विट केले जात असून सोशल मीडियावर अशी फौज असल्याचे दिसून येत आहे, जे शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहे.
मोहम्मद जुबेर हे ऑल्ट न्यूज (AltNews) नावाची फॅक्ट चेकिंग वेबसाइट चालवतात. कथित तथ्य तपासणीच्या नावाखाली लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या अटकेचा विरोध केला जात आहे.