Friday, November 22, 2024
Homeग्रामीणआळंदी : हाताने लिहिलेली ज्ञानेश्वरी अर्पण केली इंद्रायणी तिरी

आळंदी : हाताने लिहिलेली ज्ञानेश्वरी अर्पण केली इंद्रायणी तिरी

आळंदी : वैराग ता.बार्शी येथील उमा शीतल गावसाने या गृहिणीने संपूर्ण ज्ञानेश्वरी हातानी लिहून आज आळंदी येथे माऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी अर्पण केली.

उमा गावसाने यांनी सांगितले की, ज्ञानेश्वरी मध्ये एकूण १८ अध्याय आणि ९ हजार ओव्या आहेत. ‘ज्ञानेश्वरी’ हे काव्य व तत्त्वज्ञान अशा दोन भिन्न रंगाच्या उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेले वस्त्र आहे. ‘ज्ञानेश्वरी’तील ओवी साडेतीन चरणाची आहे. या ग्रंथात अनेक अलंकार आले आहेत. उपमा, अनुप्रास, दृष्टांत अशा अलंकारांचा मुक्त वापर ‘ज्ञानेश्वरी’त आहे- कीर्तनातून ऐकलेली ज्ञानेश्वरी मानसिक समाधान देते. 

मी कोव्हीड काळात सांजवात लावल्यानंतर अर्धा तास ज्ञानेश्वरीच्या ओव्या लिहायला सुरुवात केली. शांत चित्ताने लिहीत गेले. या सर्व ओव्या पूर्ण करण्यासाठी मला पूर्ण एक वर्ष लागले. ज्ञानेश्वरीमध्ये जीवन जगण्याचे तत्वज्ञान माऊलीने सोप्या भाषेत सांगितले आहे, असेही त्यांनी आळंदी येथे सांगितले.

दरवर्षी हजारो भक्त ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित लिहितात. आळंदी येथे माऊलीच्या चरणी अर्पण करतात. अनेक शतकपासून सुरू असलेली ही परंपरा आधुनिक युगातही सुरू आहे, असे ह.भ.प. बाळासाहेब चोपदार यांनी सांगितले. ज्ञानेश्वर महाराज समिती संस्थानच्या वतीने चोपदार यांनी हस्तलिखित स्वीकारले.

लॉकडाऊनमध्ये अनेकांनी वेगवेगळे छंद जोपासले; यामध्ये शिराळा येथील शिवाजी वसंतराव शिंदे यांनी लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण ज्ञानेश्वरी हाताने लिहून काढली आहे. लाॅकडाऊनच्या काळात घरात बसून काय करायचे? हा प्रश्न सगळ्यांसमोर होता. यातून शिवाजी शिंदे यांना ज्ञानेश्वरी लिहायची कल्पना सुचली आणि त्यांनी ज्ञानेश्वरी लिहायला घेतली.

जवळपास अडीच महिन्यांत संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली आहे. इथून पुढे अनेक वर्षे २०२० साल लक्षात राहील. कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे नातेसंबंधांवर मोठा परिणाम झाला आहे. लाॅकडाऊनमुळे लोकांचे जगणे बदलून गेले आहे; पण या लाॅकडाऊनला सकारात्मक घेऊन शिवाजी वसंतराव शिंदे यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी हाताने लिहून पूर्ण केली. शिंदे यांना भजनाची आणि ज्ञानेश्वरी वाचनाची आवड आहे. त्यांनी लाॅकडाऊनच्या काळात बाॅलपेनच्या साहाय्याने, हाताने ४०० पानी वहीवर ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली. कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त दहा ते बारा तासांपर्यंत एका जागेवर बसून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे.

ज्ञानेश्वरी वाचून समजत नव्हती; म्हणून लिहून काढली. यामुळे आता ज्ञानेश्वरी चांगली समजू लागली आहे, असे ते सांगतात. ज्ञानेश्वरी लिहिण्याची प्रेरणा आणि मार्गदर्शन त्यांना रघुनाथ मारुती कदम यांच्याकडून मिळाले. गेल्या अनेक वर्षांपासून रघुनाथ कदम हे अखंड ज्ञानेश्वरी वाचन करीत आहेत. एकादशी, द्वादशी, रविवार, गुरुवार असे चार दिवस त्यांच्या घरी भजन असते. अनेक ग्रंथांचे त्यांनी वाचन केले आहे. त्यांनीसुद्धा ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली होती.

संबंधित लेख

लोकप्रिय