घोडेगाव : विविध पेसा भरतीसाठी शासनाने पेसा दाखल्याची अट घालण्यात आली आहे. पेसा दाखला मिळवण्यासाठी आदिवासी तरुणांना दमछाक होत होती. या संंदर्भात विविध संघटनांनी प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत बोलूनही प्रश्न सुटत नव्हता. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने आज (दि.२) प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केल्यानंतर ‘पेसा दाखला’ मिळणे सुलभ झाले आहे.
पेसा दाखला काढण्यासाठी संबंधित उमेदवारांनी आपल्या गावातील ग्रामसेवक दाखला जोडावा लागतो आहे. परंतु बरेच दिवसांपासून हा दाखला देणे बंद आहे त्यामुळे संबंधित ग्रामसेवक दाखला देण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे ही अट रद्द करण्यात आली आहे. तसेच पन्नास वर्षांचा पुरावा जातपडताळणी असल्यास त्याची आवश्यकता असणार नाही, तसेच जातीचा दाखला नमुना क ग्राह्य धरले जाणार आहे.
यावेळी सेंट्रल किचन बंद करावे, वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरळीत करावी, पुढील आठवड्यात वसतिगृह व आश्रमशाळांमध्ये प्रकल्प अधिकारी व एसएफआय चे पदाधिकारी यांचा संयुक्त दौरा करणे आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास एसएफआय शी संपर्क साधावा असे आवाहन एसएफआय चे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ यांनी केले आहे.
शिष्टमंडळात एसएफआय चे जिल्हाध्यक्ष अविनाश गवारी, जिल्हा सचिव नवनाथ मोरे, आंबेगाव तालुका सचिव समीर गारे, जुन्नर तालुका सचिव अक्षय घोडे, पुणे शहर अध्यक्ष अक्षय निर्मळ, जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण गवारी, जिल्हा समिती सदस्य राजू शेळके आदींसह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.