जलपायगुडी : रविवारी पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळाने मोठा विध्वंस केला आहे. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हे वादळ आलं. सुमारे 10 मिनिटं चाललेल्या वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं (Cyclone ) आहे. या वादळाच्या तडाख्यात शेकडो झाडे उन्मळून पडली आणि शेकडो घरांचं नुकसान झालं आहे.
मैनागुरीतील अनेक भागात जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले, झाडे उन्मळून पडली आणि विजेचे खांबही पडले, राजारहाट, बरनीश, बकाली, जोरपकडी, माधबडंगा आणि साप्तीबारी या शहरात आणि आसपासच्या गावात वादळाने धुमाकूळ घातला, घरे, विजेचे खांब कोसळून जनजीवन प्रभावित झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. जखमींना दाखल केलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटललाही त्यांनी भेट दिली. द्विजेंद्र सरकार (52), अनिमा रॉय (49), जोगेन रॉय (70) आणि समर रॉय (64) अशी मृतांची नावे आहेत.