माढा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ब्रिटिशांची साम्राज्यवादी सत्ता मान्य नव्हतीच. मात्र राजकीय स्वातंत्र्य आणि सत्तेपेक्षा इथल्या समाज व्यवस्थेत आर्थिक आणि सामाजिक समता त्यांना महत्त्वाची वाटत होती. त्यामुळे समतेचे मूल्य जनमानसात रुजवण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम केले. बाबासाहेबांचा आयुष्य हा गतिमान संघर्ष होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, तत्त्वचिंतक, अर्थतज्ञ, समाजतज्ञ, इतिहासतज्ञ, जलतज्ञ, धर्माचे तौलनिक अभ्यासक, थोर प्रज्ञावंत अशा विविध भूमिकांतून त्यानी मांडलेले मनुष्यकेंद्री तत्त्वज्ञान अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांच्या विचाराचा अवलंब केला तर निश्चितपणे स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या वेळी हा देश सर्वार्थाने प्रगत,उन्नत व प्रगल्भ झालेला असेल असे मत प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाचे संपादक प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय माढा (जि. सोलापूर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयतचे जनरल बॉडी सदस्य ऍड. बाळासाहेब पाटील होते.
महाविद्यालयाच्या इतिहास, ग्रंथालय व माहितीशास्त्र आणि सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांनी केले होते. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. गोवर्धन दिकोंडा यांनी करून दिला. मंचावर उपप्राचार्य डॉ.अशोक कदम उपस्थित होते. प्रारंभी महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील मांडणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्याची समकालीन आणि सार्वकालीन प्रस्तुतता यावर सविस्तर विचार व्यक्त केले. ऍड. बाळासाहेब पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतातून आंबेडकरांच्या विचारधारेची गरज प्रतिपदित केली. प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांनी अशा कार्यक्रमाच्या आयोजना मागील महाविद्यालयाची भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी त्यापासून बोध घेऊन आपले व्यक्तिमत्व संपन्न करावे असे सांगितले.
यावेळी ग्रंथ प्रदर्शन व चित्र प्रदर्शन याचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. डॉ.प्रेमचंद गायकवाड यांनी आभार मानले. प्रा. डॉ.संगीता पैकेकरी यांनी सूत्रसंचालन केले.