मुंबई : मराठा समाजातील बहुतांश लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी आरक्षणाचा लढा मी लढत आहे. माझ्या या लढ्याला मराठा समाजातील सर्व बांधवांनी सहकार्य करावे. मराठा आरक्षणासह इतर सात मागण्यांबाबत राज्य सरकारने आपला शब्द पाळला नसल्याने मी बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. आजाद मैदानात त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली असून त्यांनी त्यानंतर मौन धारण केले. यावेळी त्यांच्या पत्नी संयोगिता राजे, मुलगा शहाजीराजे यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपोषणाला आमदार प्रसाद लाड खासदार धैर्यशील माने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाठिंबा दिला. मराठा समाजातील 30 टक्के लोक श्रीमंत आहे परंतु माझी लढाई ही उर्वरित 70 टक्के गरीब लोकांसाठी आहे. त्यासाठी मराठा आरक्षण मागत आहे अशी भूमिका संभाजीराजे यांनी यावेळी मांडली.
याआधी संभाजीराजे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. आरक्षण हा विषय दीर्घकालीन असल्याने कोल्हापुरात 16 जून 2019 रोजी मूक आंदोलन करण्यात आले होते. त्यामध्ये संभाजीराजे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
मराठा समाजामध्ये आरक्षण न मिळाल्याने प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे त्या असंतोषाचा चेहरा म्हणून संभाजी राजे यांच्याकडे मोठ्या आशेने पाहिले जाते.