Saturday, May 18, 2024
Homeजिल्हाआदिवासी विद्यार्थ्यांसोबत दुजाभाव का ? आदिवासी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करा – SFI...

आदिवासी विद्यार्थ्यांसोबत दुजाभाव का ? आदिवासी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करा – SFI ची मागणी

पुणे : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या मार्फत राज्यातील 9 विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या अनिवासी MPSC, UPSC प्रशिक्षणातील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनामध्ये वाढ करा, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने TRTI चे उपसंचालक हंसध्वज सोनवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी औरंगाबाद, जळगाव, सोलापूर, पुणे या ठिकाणावरून विद्यार्थी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था (TRTI) पुणे च्या वतीने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यासाठी निशुल्क प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण अनिवासी असल्याकारणाने मुलांना बाहेर राहण्याची सोय करावी लागते. तसेच बाहेर राहून अभ्यासिकेचा व स्टेशनरीचा खर्च द्यावा लागतो. तसेच येणारा खर्च पाहता 6 हजार रुपये विद्यावेतन तोकडे पडत आहे. सर्वच विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच पुस्तक खरेदीसाठी देऊ केलेल्या रकमेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी एसएफआय ने केली आहे.

महाज्योती, सारथी, बार्टी व यशदा या संस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतन 10 हजार रुपये व पुस्तक संच व इतर गोष्टीसाठी 15 हजार रुपये रक्कम देण्यात येते. मग आदिवासी विद्यार्थ्यांसोबत असा दुजाभाव का ? असा सवालही विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांनाही दरमहा विद्यावेतन 10 हजार रुपये व पुस्तक संच व इतर गोष्टीसाठी 15 हजार रुपये रक्कम देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

उपसंचालक हंसध्वज सोनवणे यांच्यासोबत 2 तास सकारात्मक चर्चा झाली. यावेळी विद्यावेतन व इतर रक्कम वाढीच्या संदर्भात 2 दिवसांत प्रस्ताव शासनाला पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्रावर येणाऱ्या अडचणीवरही चर्चा झाली.

निवेदन देतेवेळी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य सचिवमंडळ सदस्य तथा पुणे जिल्हा सचिव नवनाथ मोरे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रूपाली खमसे, जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण गवारी, औरंगाबाद विद्यापीठातील राजू भुजडे, अक्षय तडवी, राघवेंद्र पथवे, ओंकार धनवे, संतोष कोकाटे, सोलापूर विद्यापीठातील गणेश पेंदाम, तसेच कुणाल बहिरम, मनोज जाधव आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय