Wednesday, January 22, 2025

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफी व ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे हंगामी वस्तीगृहे तात्काळ सुरू करा – SFI ची मागणी

बीड : दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे ही मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे बीड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठवण्यात आलेल्या निवेदनाद्वारे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया बीड जिल्हा कमिटीच्या वतीने करण्यात आली. 

बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे प्रतिवर्षी लाखो कुटुंब पोटाची खेळणी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात व पर राज्यात ऊसतोडणी करण्यासाठी जातात अशावेळी या ऊसतोड कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. अशा विद्यार्थ्यांसाठी हंगामी वस्तीगृह सुरू करण्यासाठी एसएफआय ने दरवर्षी नेहमी पुढाकार घेतला असून वेळोवेळी प्रशासनास अशी वस्तीगृहे सुरू करण्यास भाग पाडले आहे. यंदा मात्र अद्यापही ही वस्तीगृहे सुरू झाले नसून हे वस्तीगृहे तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एसएफआयच्या वतीने देण्यात आले आहे. शाळा सुरू होण्याच्या सुरुवातीला हे वसतिगृहे सुरू झाले नाही तर जिल्हा परिषदेवर विद्यार्थ्याना घेऊन मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. 

यावेळी एसएफआयचे जिल्हाध्यक्ष लहू खारगे, बीड तालुकाध्यक्ष शिवा चव्हाण, तालुका उपाध्यक्ष अक्षय वाघमारे, जिल्हा कमिटी सदस्य अभिषेक आडागळे, डीवायएफआय युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष सुहास जायभाय, एसएफआयचे उत्तरेश्वर मस्के, अभिषेक गुंदेकर, कृष्णा जगताप आदी विद्यार्थी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles