Thursday, November 21, 2024
Homeग्रामीणमणिपूर अत्याचार प्रकरणी आदिवासी समाजाने एकत्र येण्याची गरज – एकनाथ मेंगाळ

मणिपूर अत्याचार प्रकरणी आदिवासी समाजाने एकत्र येण्याची गरज – एकनाथ मेंगाळ

अकोले : मणिपुरमध्ये आदिवासी समाजावर अत्याचार होत आहेत. आदिवासी महिलांची विवस्र धिंड काढली जात आहे. केवळ आदिवासीच नव्हे तर संपूर्ण मानवतेलाच मान शरमेने खाली घालायला लावणारी ही घटना आहे. डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी.वाय.एफ.आय.) व आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच या संघटनांच्या वतीने या घटनांचा जाहीर धिक्कार व्यक्त करण्यात येत आहे, असे संघटनेचे नेते एकनाथ मेंगाळ यांनी सांगितले.

आदिवासी समाजावर मणिपुरमध्ये अनन्विक अत्याचार होत असताना मणिपूर मधील व देशातील भाजप सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. महिलांची नग्न धिंड काढली जात असताना दोषींना साधी अटकही करण्यात येत नाही. काही समाज कंटक मणिपूरमधून आदिवासी समाजाचे नामोनिशान मिटवून टाकण्याची जाहीर वक्तव्य करत असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. देशात अराजक असल्याचे हे धोतक आहे. असे असताना केवळ निवडणुकांचे गणित लक्षात ठेऊन आदिवासींवरील या अत्याचाराकडे सोयीने दुर्लक्ष केले जात आहे.

सध्या देशभर जागतिक आदिवासी दिनाची तयारी सुरु आहे. ९ ऑगस्ट दिनी जगभरात आदिवासी दिन साजरा करून आदिवासींच्या मानवी अधिकाराच्या रक्षणाचा संकल्प व्यक्त केला जातो. भारतात मात्र आदिवासींवर होत असलेल्या अत्याचारांबाबत मौन बाळगले जात आहे.

९ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजातील विविध संघटना, नेते कार्यकर्ते यांनी पुढाकार घेत सर्व आदिवासी व बिगर आदिवासी सजग जनतेला सोबत घेत मणिपूर अत्याचारा विरोधात रोष प्रगट करण्याची आवश्यकता आहे. डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया व आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच यासाठी राज्यभर पुढाकार घेत असून तमाम जनतेला सोबत घेत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तहसील कार्यालयांवर मोर्चे आयोजित केले जात आहेत.

अकोले तालुक्याला आदिवासी व बिगर आदिवासी क्रांतीकारकांची मोठी परंपरा लाभली आहे. अकोल्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत मणिपूर घटनेच्या निषेधार्थ ९ ऑगस्ट दिनी रस्त्यावर उतरले पाहिजे. सर्व जाती धर्माच्या व राजकीय विचारांच्या सजग नागरिकांना एकत्र करून या घटनेचा धिक्कार केला पाहिजे. देशातील आदिवासी महिलांची धिंड काढली जात असताना जल्लोष व्यक्त करणाऱ्यांना समाज माफ करणार नाही याचे भान या निमित्ताने सर्वांनी ठेवले पाहिजे, असेही एकनाथ मेंगाळ, नामदेव भांगरे, तुळशीराम कातोरे, मथुराबाई बर्डे, राजू गंभिरे यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय