जुन्नर / आनंदा कांबळे : गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नगर रस्त्याचा जटील प्रश्न सोडविण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने पुणे – शिरुर या ६७ कि. मी. लांबीच्या रस्त्यावरील प्रस्तावित दुमजली पुलाच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी ७ हजार २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
लोकसभा निवडणुकीत शिरुर लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरला होता. त्यामुळे विजयी झाल्यानंतर पुणे – नाशिक रस्ता व पुणे – शिरूर रस्ता ही कामे आपल्या प्राधान्य यादीत असतील असे सातत्याने खा. डॉ. कोल्हे सांगत होते.
त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून पुणे – शिरुर रस्त्याच्या कामासाठी त्यांनी अनेक बैठका घेतल्या होत्या. विविध पर्यायांचा विचार विचार करण्यात येत होता. भूसंपादन करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन दुमजली पुलांसह १८ पदरी रस्ते करण्याचा पर्याय निवडण्यात आला. त्यानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे सादरीकरण पार पडले. खासदार डॉ. कोल्हे व आमदार अॅड. अशोकबापू पवार यांच्याशी सल्लामसलत करून उपमुख्यमंत्री पवार यांनी अखेरीस दुमजली पुलांसह १८ पदरी रस्ते करण्याच्या पर्यायावर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर या रस्त्याच्या प्रस्तावाच्या कामाला गती मिळाली होती.
खासदार डॉ. कोल्हे यांचे प्रयत्न आमदार पवार यांचे सहकार्य आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या पुढाकाराने झालेले प्रयत्न यशस्वी झाले असून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने कि.मी. १०/६०० ते ७७/२०० या ६७ कि. मी. लांबीच्या रस्त्याच्या ७ हजार २०० कोटी रुपयांच्या कामाला प्राथमिक मंजुरी दिली आहे.
या संदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, एखादा शब्द आपण मतदारांना दिल्यानंतर त्याची पूर्तता होते त्याचा आनंद वेगळाच असतो. पुणे – शिरूर रस्त्याची वाहतूक कोंडी हा खूपच जटील प्रश्न होता. रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशनच्या प्रत्येक बैठकीत हा प्रश्न मांडला जात होता. शिक्रापूर, वाघोलीसह विविध ठिकाणची वाहतूक कोंडी हा चिंतेचा विषय बनला होता. त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी अनेक बैठका घेतल्या. विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. त्यातूनच दुमजली पुलांसह १८ पदरी रस्ते करण्यास मंजुरी मिळाली, याबद्दल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मी मनापासून आभार मानतो. या पुढील काळात हे काम लवकर व्हावे यासाठी आमदार अॅड. अशोक बापू पवार आणि आपण जातीने लक्ष घालणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.