Friday, March 29, 2024
Homeजिल्हापथविक्रेते अतिक्रमण करत नाहीत, व्यवसाय करतात, कारवाई केल्यास आंदोलन करण्याचा हॉकर्स युनियनचा...

पथविक्रेते अतिक्रमण करत नाहीत, व्यवसाय करतात, कारवाई केल्यास आंदोलन करण्याचा हॉकर्स युनियनचा इशारा

पिंपरी चिंचवड : पथविक्रेते अतिक्रमण करत नाहीत, व्यवसाय करतात, कारवाई केल्यास आंदोलन करण्याचा इशारा हॉकर्स युनियनने दिला आहे.

मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी पथविक्रेते यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, त्याचा पिंपरी चिंचवड महानगर हॉकर्स युनियनने निषेध केला आहे.

सुप्रीम कोर्टाने महापालिकांना राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शहरातील सर्व पथारी व्यावसायिक आणि फेरीवाल्यांची नोंदणी करून त्यांना स्मार्ट कार्ड आणि ओळखपत्र देण्यात यावीत, आणि त्यांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून स्ट्रीट व्हेंडर्सचा दर्जा द्यावा, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश असूनही राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार स्थानिक स्वराज्य संस्था, मनपा यांनी त्याची नोंदणी करावी, त्यांना बायोमेट्रिक कार्ड द्यावे, असे हे धोरण आहे. परंतु या धोरणाला मनपाने दुर्लक्षित केल्यामुळे शहरातील हजारो पथविक्रेते, फेरीवाले अनधिकृत ठरवले गेले आहेत, असेही हॉकर्स युनियनने म्हटले आहे.

कोरोना महामारीच्या सलग दोन वर्षांच्या काळात सामान्य आणि गोर गरीब कुटुंबाना रस्त्यावर व्यवसाय करण्याची वेळ आली आहे. 2009 पासून सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाकडे  मनपाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत स्ट्रीट व्हेंडर्सना योजना आहेत, प्रभाग वाईज हॉकर्स झोन  मनपाने का केले नाहीत? स्मार्ट सिटी अंतर्गत बाकी सर्व कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवताना मनपातील सत्ताधारी भाजप आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी 2015 पासून खूप मोठी कार्यक्षमता दाखवली आहे, त्याचे आम्ही कौतुक करतो, असेही म्हटले आहे.

तसेच गोरगरीब फेरीवाल्यांचे जगण्याचे व्यवसाय स्वातंत्र्य प्रशासन मान्य करत नाही, याचा निषेध करत असल्याचे ही म्हटले आहे. फेरीवाला, पथविक्रेते विकसित देशातही अधिकृत आहेत. मनपा प्रशासनाने का योजना आखली नाही. या स्मार्ट कार्डामुळे शहरातील पथारी आणि फेरीवाल्यांची अधिकृत माहिती पालिकेकडे नोंदली जाणार असल्याने सुरुवातीच्या काळात स्पष्ट करण्यात आले होते. या धोरणाच्या माध्यमातून रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची नोंदणी करणे, त्यांना ओळखपत्र देण्याचे, त्यांच्या व्यवसायासाठी जागा निश्चित करण्याचे बंधन महापालिकेवर घालण्यात आले आहे. पथारी व्यावसायिक, फेरीवाले, विक्रेते यांचे जागेवर जाऊन सर्वेक्षण करणे, बायोमेट्रिक पद्धतीने त्यांची माहिती संकलित करणे, त्यांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात यावे. हे ओळखपत्र दिल्यानंतर पालिकेने ठरवून दिलेल्या जागेत या फेरीवाल्यांना व्यवसाय करून कायदेशीर उदरनिर्वाह त्यांना करून द्यावा, असेही गणेश दराडे यांनी म्हटले आहे.

दहा वर्षे शहरातील फेरीवाले अतिक्रमण कारवाई, बेकायदेशीर खंडणी यामुळे वैतागले आहेत. सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे शेतकरी कामगार आत्महत्या करतात आता पथविक्रेत्यांनी आत्महत्या कराव्यात का?

मनपा प्रशासनाच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी पथ कारवाई केल्यास हॉकर्स युनियन आंदोलन करेल, असा इशारा निमंत्रक गणेश दराडे यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे. या पत्रकावर गणेश दराडे, स्वप्निल जेवळे, सुषमा इंगोले, सचिन देसाई यांच्या सह्या आहेत.


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय