Friday, April 26, 2024
Homeग्रामीणVideo : किल्ले शिवनेरीवर उभारले जाणार 'राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबा' चे...

Video : किल्ले शिवनेरीवर उभारले जाणार ‘राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबा’ चे शिल्प

पुणे : “पुणे महानगरपालिकेच्या वतीने ” रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज”यांच्या जन्मस्थळी, किल्ले शिवनेरीवर “राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबा’चे शिल्प उभारणार असल्याची माहिती पुणे महानगर पालिकेने एका पत्रकार परिषदेत दिली आहे. नगरसेवक अब्दुल गफूर अ. पठाण यांनी या बाबतचा ठराव दिला होता.

याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले की, राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबा”चे शिल्प किल्ले शिवनेरीवर उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. 

रासने म्हणाले “राजमाता जिजाऊ या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे निर्माते, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापूर्वी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर वास्तव्यास आल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली बाल शिवबाचे शिक्षण शिवनेरी किल्ल्यावर झाले. त्यानंतर “बाल शिवबा आणि राजमाता जिजाऊ” पुण्यातील कसबा पेठ येथील “लालमहाल” येथे वास्तव्यास आले. राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले निर्माण केले, महाराष्ट्रातील दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना बरोबरीला घेऊन शत्रूबरोबर लढाईत जिंकून घेतले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा महापराक्रम आणि राजमाता जिजाऊंचे संस्कार तसेच योग्य आणि अचूक मार्गदर्शन अवघ्या भारत देशात आणि जगातही प्रेरणादायी आहेत. “माँसाहेब आणि बाल शिवबा”ला मानवंदना देण्यासाठी किल्ले शिवनेरीवर शिल्प उभारण्यात येणार असल्याचे रासने यांनी सांगितले. 

रासने पुढे म्हणाले की, पुणे महानगर पालिकेच्या वतीने सिंहगड किल्ल्यावर सन २०१७ मध्ये “शूरवीर तानाजी मालुसरे”यांचे शिल्प उभारण्यात आले. पुरंदर किल्ल्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प उभरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. याच धर्तीवर किल्ले शिवनेरी येथे “राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबा”यांचे शिल्प उभारण्यात येणार आहे. 


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय