पणजी : महाराष्ट्राच्या राजकारणानंतर आणखी एका राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. गोव्यात काँग्रेसचे ११ पैकी ८ आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहे. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवार ११ जुलैपासून सुरू होत आहे. या अगोदरच गोव्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडून देणाऱ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या भूकंपानंतर आता गोव्यातील काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव हे या आमदारांची समजूत काढत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या चर्चेवर गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. या अफवा असून आमचा कोणताही आमदार भाजपाच्या वाटेवर नसल्याचे गोवा काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, काँग्रेसचे ११ पैकी ८ आमदार भाजपाच्या संपर्कात असून या मंत्र्यांनी भाजपाकडे तीन कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केल्याच्या चर्चा सुरु होत्या. ऑक्टोबर २०१९ मध्ये विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्यासह काँग्रेसच्या १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.