पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्तीचा क्षण माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा क्षण आहे, अशी भावना कु. वैष्णवी विनोद जगताप हिने व्यक्त केली आहे. The moment of receiving the Shiv Chhatrapati Award is the supreme joy
जलतरण या क्रीडाप्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशासाठी पदक जिंकण्याचा निर्धारही तिने यावेळी व्यक्त केला. क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडू कु. वैष्णवीला नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुण्यात प्रदान करण्यात आला. अशाप्रकारचा पुरस्कार मिळवणारी वैष्णवी ही पिंपरी चिंचवड शहरातील पहिलीच महिला खेळाडू आहे. याचे औचित्य साधून दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने वैष्णवीचा तिच्या राहत्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ शिवले, उपाध्यक्ष संतोष बाबर यांच्यासह सचिन साठे, राजेश सावंत, संतोष चांदेरे, नंदकुमार कांबळे, अविनाश ववले हे पदाधिकारी व विनोद जगताप, उमा जगताप आदी कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी बोलताना वैष्णवीने सांगितले की, मी जन्मापासून पायाने ७५ टक्के अपंग आहे. सुरूवातीला पायांचा व्यायाम म्हणून पोहण्यास सुरूवात केली. नंतर पोहण्याच्या स्पर्धेत उतरले. २०१२ पासून माझी या क्रीडाप्रकाराची सुरूवात झाली. पुढे अनेक अडचणींवर मात करत आतापर्यंतचा खडतर प्रवास पूर्ण केला आहे. आई, वडिलांचा आशिर्वाद आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व पाठबळ मोलाचे ठरले. शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देशासाठी पदक मिळवून देण्याचा निर्धार तिने व्यक्त केला.
अल्प परिचय : मूळची साताऱ्यातील उडतरे गावची असलेली वैष्णवी विनोद जगताप (वय २१, रा. पिंपरी) ही जन्मापासून ७५ टक्के अपंग आहे. तिने आतापर्यंत अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत तिने २६ सुवर्ण, ५ रजत आणि ७ कास्य अशी एकूण ५५ पदके प्राप्त केली आहेत. २२ ते २८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान चीन येथे होणाऱ्या एशियन गेम्स साठी वैष्णवीची निवड झालेली आहे.