Saturday, May 4, 2024
Homeराज्यराज्यात अनेक भागात पावसाची संततधार सुरूच,मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

राज्यात अनेक भागात पावसाची संततधार सुरूच,मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

मुंबई:- मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार कायम आहे. मुंबईत  सखल भागात पाणी भरलं असून, गांधी मार्केट माटुंगा, हिंदमाता, बीपीटी कॉलनी,चेंबूर रेल्वे स्थानक, पोस्टल कॉलनी चेंबूर या भागात अजूनही पाण्याचा निचरा झाला नसल्यानं  या भागातली  वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवण्यात  आली आहे.  तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवरची वाहतूक सुरू आहे. 

गेल्या २४ तासात कुलाबा इथं ५३ पूर्णांक २ मिलिमीटर आणि सांताक्रुझ इथं ८४ पूर्णांक ३ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

मुंबई, पुणे, नाशिक आणि राज्याच्या अन्य भागाला  आज सलग दुसऱ्या दिवशी हवामान विभागानं सतर्कतेचा  इशारा दिला आहे.

रायगड  जिल्हयात गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं  जिल्ह्यातलं  जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातल्या  सर्व नद्यांना पूर आला असून नदी काठावरच्या  नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस पडत असून जगबुडी आणि बावनदी या दोन नद्या धोक्यााच्या पातळीवरून वाहत आहेत. रत्नागिरी तालुक्यात बावनदीचं पाणी पुलावरून वाहू लागल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक आज सकाळपासून बंद करण्यात आली आहे. 

वाशिष्ठी,  काजळी आणि कोदवली या नद्या धोक्याच्या  पातळीवरून  वाहू लागल्या आहेत. त्यामुळे चिपळूण आणि राजापूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

सांगली जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरु असून  वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे,  तर जत,आटपाडी,खानापूर, कवठे महांकाळ या दुष्काळी भागातही पावसानं  चांगली सुरुवात केली आहे. पावसानं  पुन्हा चांगली सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. 

सातारा जिल्ह्यात  गेल्या २४ तासात  ५२.७५ मि.मी. पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी ५८२.९८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.   जिल्ह्यातल्या  प्रमुख धरणांची पाणी पातळी वाढली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय