Friday, November 22, 2024
Homeजिल्हाखाजगी रुग्णालयावर कारवाई करा - उपमहापौर श्रीमती हिराबाई घुले

खाजगी रुग्णालयावर कारवाई करा – उपमहापौर श्रीमती हिराबाई घुले

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची लूट केली जात आहे. राज्य सरकारने निश्चित करून दिलेल्या दरापेक्षा जादा बिलांची आकारणी केली जात असल्याचा तक्रारी सातत्याने येत आहेत. महापालिकेने खासगी रुग्णालयातील बिलांची तपासणी करण्यासाठी अधिका-यांची नियुक्ती केली. पण, त्याचाही परिणाम खासगी रुग्णालयांवर झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे जादा बील आकारणी करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी. जास्तीचे आकारलेले पैसे वसूल करून रुग्णांना परत करावेत, अशी सूचना उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे पालकमंत्री असलेल्या जालना जिल्ह्यातील प्रशासनाने कोरोना रुग्णांकडून जास्तीचे बील आकारणा-या खासगी रुग्णालयांकडून लाखो रुपये वसूल करून कोरोना रुग्ण, नातेवाईकांना परत केले आहेत. त्याचधर्तीवर पिंपरी महापालिकेने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सुचविले आहे.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की, शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ सुरू झाल्याने बेडची कमतरता भासू लागली. त्यामुळे महापालिकेने शहरातील खासगी रुग्णालयांना कोरोनावरील रुग्णांवर उपचारासाठी परवानगी दिली. शहरातील तब्बल 135 खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली. राज्य सरकारने ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडचे दर निश्चित केले. परंतु, शहरातील खासगी रुग्णालयात त्याचे पालन झाले नसल्याचे नागरिकांच्या तक्रारींवरून दिसून येत आहे.

कोरोनाच्या महामारीत खासगी हॉस्पिटलने नागरिकांची आर्थिक पिळवणूक केली. जास्तीचे बील आकारले. पाच ते दहा लाख रुपयांची बिले दिल्याच्या तक्रारी आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. हाताला काम नाही. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असताना खासगी रुग्णालयांनी जास्तीचे बील आकारले आहेत. अनेकांनी कर्ज काढून रुग्णालयांची बिले भरली आहेत. महामारीत रुग्णांची लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्या बिलांची व्यवस्थित तपासणी करावी. जास्तीचे आकारलेले पैसे वसूल करावेत आणि नातेवाईकांना परत द्यावेत. जास्तीचे बील आकारलेल्या रुग्णालयांची कोरोना रुग्णांवरील उपचाराची परवानगी रद्द करावी. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपमहापौर घुले यांनी निवेदनातून केली आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय