सिंधुदुर्ग : आशा व गटप्रवर्तक आठवडाभर सरकारचा प्रतिकात्मक निषेध करणार असल्याची माहिती सिंधुदूर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन CITU संलग्न च्या अध्यक्षा अर्चना धुरी, सचिव कॉ. विजयाराणी पाटील यांनी दिली.
विजयाराणी पाटील म्हणाल्या की, आशा वर्कर्स व गटप्रवर्तक कोविडचे मोठ्या हिंमतीने लाभार्थी गटाचा सर्व्हे व नियमित कामे करीत आहेत. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक बुधवार 26 मे 2021 पासून पुढे आठवडाभर जमेल त्या पध्दतीने आंदोलन करून केंद्र सरकारचे विरोधात काळा सप्ताह पाळणार आहेत. काळी साडी किवा काळा ड्रेस परीधान करून, सरकारचा प्रतिकात्मक निषेध करनार आहेत.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे ३ कायदे रद्द करावे यासाठी शेतकऱ्यांचे चलो दिल्ली आंदोलन 26 नोव्हेंबर 2020 ला सुरू झाले. केंद्रीय कामगार संघटनानी या मोदी सरकारने 41 कामगार कायदे बदलून 4 श्रम संहिता मंजूर करून कामगारांची गळचेपी सुरू केली, त्याचे निषेधार्थ 26 नोव्हेंबर 2020 ला देशव्यापी संप केला. आज याला सहा महीने होणार आहेत, म्हणून सरकारने शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत आणि श्रम संहिता मागे घ्याव्यात, वीज दुरूस्ती विधेयक मागे घ्यावे, सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करू नये, राज्याला कोविड निधी व लशी लवकर द्याव्यात या मागण्या बरोबरच आशा व गटप्रवर्तक यांना आरोग्य सेवेत कायम करावे, त्यांना किमान वेतन लागू करावे, सामाजिक सुरक्षा लागू करावी इत्यादी मागण्या घेऊन आंदोलन यशस्वी करणार असल्याच्या ही कॉ. पाटील म्हणाल्या.