कोल्हापूर : बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना तातडीने सुरू करण्यात यावे, या प्रमुख मागणींसह अन्य मागण्यांसाठी आज दि. ५ ते ७ सप्टेंबर रोजी संपुर्ण राज्यभर गावागावातील बांधकाम कामगारांनी ग्रामसेवकां मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मेडीक्लेम योजनेसाठी एल्गार पुकारला असल्याची माहिती लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. भरमा कांबळे व जिल्हा सचिव कॉ. शिवाजी मगदूम यांनी दिली.
आघाडी सरकारने सुरू केलेली मेडीक्लेम योजना भाजप सरकार सत्तेवर आल्यानतंर बंद केली. त्यामुळे आघाडी सरकारने बांधकाम कामगारांची जिवनदायी असणारी मेडिक्लेम योजना तातडीने सुरू करावी, यासाठी बांधकाम कामगारांनी राज्यव्यापी एल्गार केला आहे.
कल्याणकारी मंडळाकडे १० हजार कोटी रुपये पडून आहेत. तरीही बांधकाम कामगारांच्या आरोग्याची कवचकुंडले असणारी मेडिक्लेम योजना सहा वर्षापासून बंद आहे. ही योजना पुर्ववत सुरू करावी. अन्यथा आता राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने करु, असा इशारा लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ भरमा कांबळे व जिल्हा सचिव कॉ शिवाजी मगदूम यांनी दिला आहे.
या निवेदनामध्ये बांधकाम कामगारांची बंद केलेली मेडिक्लेम योजना चालू करा, बांधकाम कामगारांच्या शिक्षण घेत असलेल्या मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन, लँपटाँप, टँबलेट द्या, बांधकाम कामगारांना घरासाठी तात्काळ अनुदान द्या. सर्व असंघटीत कामगारांना कोविड अनुदान रुपये दहा हजार दयावेत, सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना रुपये २००० आणि ३००० रुपयांचा लाभ दया, ६० वर्षावरील बांधकाम कामगारांना पेन्शन योजना लागू करा, जालना जिल्हाधिकारी बिनवडे यांनी आंदोलन करणाऱ्या कॉ गोविंद आर्दड यांना अर्वाच व गुंडगिरीची भाषा वापरली त्यांची ताबडतोब बदली करा, या मागणीसह असंघटित कामगारांचे मंडळ स्थापन करून असंघटित कामगारांना कोविड अनुदान रुपये दहा हजार दया आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉ. प्रकाश कुंभार, संदीप सुतार, भगवानराव घोरपडे, विक्रम खतकर, आनंदा कराडे, शिवाजी मोरे, मनोहर सुतार, कुमार कागले, मोहन गिरी, रमेश निर्मळे, दत्ता कांबळे, दत्ता गायकवाड, नवनाथ चौगुले, दगडू कांबळे, अजित मगदूम, परसु कांबळे, नामदेव पाटील, कृष्णात खुटाळे आदीनी परीश्रम घेतले.