पालघर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे आदिवासी विकास विभागातील विविध मागण्यांना घेऊन जव्हार प्रकल्प कार्यालयाला निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, अनलॉक लर्निंग प्रकल्पाचे संनियंत्रण व अंमलबजावणीतील पारदर्शकता जपण्यासाठी अतिशय सुलभ प्रणाली ‘अनलॉक लर्निंग’ हा पथदर्शी प्रकल्प हा शाळेतूनच राबविला जावा. या योजनेआड ऑनलाईन शिक्षण व्यवस्था आदिवासी आश्रमशाळांमध्ये आणण्याचा प्रयत्न करू नये. आश्रमशाळांचे डिजिटलाझशन करण्यात यावे. सर्व आश्रमशाळा सुरु करण्यात याव्यात. तसेच आश्रमशाळा या अशा ठिकाणी असतात कि जेथे बाहेरील व्यक्तीचा संपर्क कमी प्रमाणात येतो त्यामुळे सर्व आश्रम शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
तसेच आश्रमशाळेत प्रवेश देताना सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची अँटीजेन, ऑक्सिजन, शरीराचे तापमान चाचणी घेण्यात यावी व संशयित असलेल्या व्यक्तीची कोरोना चाचणी घेण्यात यावी. शिक्षकांनी शाळेच्या ठिकाणी राहिले पाहिजे. त्यांच्यासाठी तरतूद असणाऱ्या निवासी गृहांमध्ये त्यांची सोय करण्यात यावी. त्यामुळे शिक्षक-विद्यार्थी संवाद घडून विध्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये वाढ होईल. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी व तत्सम बाबींसाठी कायमस्वरूपी आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कन्या आश्रमशाळेत व प्रत्येक आश्रमशाळेत स्त्री अधिक्षक असणे गरजेचे आहे त्यांची जी पदे रिक्त आहेत ती त्वरित भरली जावीत. मूलभूत सुविधांमध्ये ग्रंथालय व प्रयोगशाळा यांनादेखील मुख्य स्थान देण्यात यावे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गाला कायमस्वरूपी करून त्यांच्या रिक्त पदांची त्वरित भरती करा, या मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदन देतेवेळी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राज्य उपाध्यक्ष कविता वरे, ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष विलास भुयाल, जिल्हा सचिव भास्कर म्हसे उपस्थित होते.