भारतात जन्मलेल्या व सगळ्या जगात कीर्ती मिळवलेल्या डॉ.भीमराव रामजी आंबेडकर या महामानवाची यशोगाथा.
भारत हा जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. लवकरच चीनला मागे टाकून पहिला क्रमांक पटकवणार आहे यात शंका नाही. अशी प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात ६५% च्या जवळपास तरुणांची संख्या आहे. आणि ही जगातील अत्यंत प्रभावशाली शक्ती आहे. लाथ मारील तिथं पाणी काढण्याची धमक या युवामहाशक्तीकडे आहे. पण या शक्तीचा, या ऊर्जेचा उपयोग कुठे होतो? आणि कसा होतो? की होतंच नाही? ही ऊर्जा कुठे कुजते, कुठे वाया जाते? याचा शोध घेतल्यावर अत्यंत अक्राळविक्राळ वास्तव समोर येते. हे वास्तव वंशपरंपरागत चालवलेल्या पद्धतीप्रमाणे बदल न होणाऱ्या त्याच त्याच चक्रात फिरत राहते. या चक्रात फिरायचं म्हणजे त्याला कुठली तरी व्यवस्था असावी लागते जी या फिरण्याला नियंत्रित करील. ही व्यवस्था आहे भारतातील वर्णावर आधारलेली समाजव्यवस्था. ही व्यवस्था मनूच्या नियमांनी बनलेली आहे. या नियमांनी व्यक्तीच्या जीवन जगण्याच्या पद्धती, आचार, (विचार), रूढी तयार केलेल्या आहेत. ज्यात व्यक्तीचं स्वतंत्र अस्तित्व लुप्त झालेले आहे. या लुप्त झालेल्या स्वातंत्र्यामुळे माणसातील मनुष्यत्व नष्ट झाले आहे. माणूस गुलाम बनला आहे. नष्ट झालेल्या मनुष्यत्वाची ओळख म्हणजे व्यक्तीच्या अस्तित्वाची होणारी जाणीव. स्वातंत्र्याची ही जाणीव शांत राहू देत नाही. डॉ.बाबासाहेब व्यक्तीस्वातंत्र्य, माणसाचे हरवलेले मनुष्यत्व याच्या शोधात निघतात. आणि त्याची लागलेली चाहूल मात्र त्यांना आयुष्यभर शांत बसु देत नाही.
गरीब-श्रीमंत दरी तेवढीच आहे. देशात प्रचंड दारिद्र्य, उपासमार, बेरोजगारी, अज्ञान, अंधश्रद्धा,भ्रष्टाचार आहे. देशातील बहुसंख्य लोकं दारिद्र्यात खितपत पडले आहेत. त्यांच्या वाट्याला किड्यामुंग्यांसारखं जगणं आलेलं आहे. अशाच अवस्थेत बाबासाहेब सुद्धा जीवन जगत होते. त्यांच्या स्वला आव्हान करणाऱ्या अनेक गोष्टी त्यांच्या आजूबाजूला घडतात, पाहायला मिळतात, ऐकायला येतात. आणि मग प्रवास सुरु होतो या आव्हान देणाऱ्या गोष्टींच्या विरोधात. माणसाच्या, सृष्टीच्या नियमाविरोधात काम करणाऱ्या रुढी, परंपरा आणि व्यवस्थांच्या विरोधात. माणसाच्या हरवलेल्या, हिरावून घेतलेल्या मनुष्यत्वासाठी.
सगळी सवर्ण मुले वर्गात बसून शिक्षण घेऊन ज्ञान मिळवू शकत असताना. बाबासाहेबांना मात्र ते स्वातंत्र्य नव्हतं. कारण खालच्या जातीच्या लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. स्त्रियांनासुद्धा हा अधिकार जातिव्यवस्थेने नाकारलेला होता.
उच्च, नीच(वरचे-खालचे) असे मनुष्याचे मनुष्यत्व हिरावून घेणारे प्रखर जातीभेद समाजात होते. हे भेदांनी शिक्षण कोणी घ्यावं, कोणी घेऊ नये, प्रवास कोणी करावा, कसा करावा, कुठपर्यंत करावा, हे ठरलेलं होतं. माणसांच्या सावल्या सुद्धा अशुद्ध, त्यांच्या पावलांचे ठसे सुद्धा अपवित्र, सार्वजनिक ठिकाणे अस्पृशांसाठी वर्ज होती. सार्वजनिक विहीर, तलाव येथे पाणी भरणं म्हणजे ते अशुद्ध करणे, विटाळ मानला जायचा. मंदिर म्हणजे स्त्रीया आणि अस्पृशांना कायमची बंदी. आजही अशी परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळते.
बाबासाहेब डोळसपणे याकडे पाहतात, समाजातील या नीतीनियमांचा अभ्यास करतात, धर्मग्रंथांची, देवादिकांची चिकित्सा करतात, माणसाला माणूस म्हणून हीन वागणूक देणाऱ्या प्रत्येकाला ज्ञानाच्या आणि सद्सद्विवेकाच्या आधारे धारेवर धरतात.
रामायण-महाभारतातील आदर्श घ्यावी अशी पात्र, त्यात प्रतिष्ठित, अत्यंत वंदनीय आणि संबंध सृष्टी निर्माता, सर्वेसर्वा समजले जाणाऱ्या देवांनाही ते सोडत नाहीत. यांच्याही नितीमत्तेवर, आणि अस्तित्वावर, त्यांच्या सर्वेसर्वा असण्यावर बाबासाहेब प्रश्न उपस्थित करतात. सत्याचा शोध घेऊन, चुकीच्या परंपरा, रूढी यात अडकलेल्या समाजाला बाहेर काढून, व्यक्तीच्या स्वतंत्र अस्तित्वाला आणि माणसाचे मनुष्यत्व मिळून देण्यासाठी मानवतेसाठी अविरत संघर्ष करतात.
शिक्षण घेण्यावर, समुद्र प्रवास करण्यावर असलेली बंदी, नियम, कायदे, शास्त्र यांना केराची टोपली दाखवत सातासमुद्रापार जाऊन प्रचंड अभ्यास करतात, अनेक पदव्या घेतात, ज्ञानाचे भांडार असलेल्या प्रचंड माहितीने भरलेल्या जगात जाऊन ज्ञान ग्रहन करतात. अनुभव संपन्न होतात.
भारतासारख्या अज्ञानाने,अंधश्रद्धेने ओतपोत भरलेल्या देशातील समाजाला शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्रत्येकाने प्राशन केले पाहिजे असे आवाहन करतात. तरुणांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ! असा अत्यंत प्रभावशाली आणि परिणामकारक मार्ग दाखवतात. भारतासारख्या देशाच्या अप्रतिम संविधानाची स्वातंत्र्य, समता,आणि बंधुता या समानतेच्या मूल्यांवर आधारित निर्मिती करतात.
स्त्रियांना चूल, आणि मूल एवढ्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांचा माणूस म्हणून स्वीकार केला पाहिजे, त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. यासाठी नियम, कायदे करतात. आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी असलेले हिंदू कोड बील जेंव्हा कायदेमंडळ मान्य करत नाही. तेंव्हा स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी, न्यायहक्कांसाठी बाणेदारपणे एक पुरुष मंत्रीपदाचा राजीनामा देतो तेंव्हा खरंच डॉ.भीमराव एक महामानव वाटतात.
डॉ. बाबासाहेब माणसाचे जीवन आणि सृष्टी सुंदर बनवणाऱ्या परंपरेचे नेतृत्व करण्यासाठी प्रेरित करतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून माणसांनी पहावे, विचार करावा, हा दृष्टिकोन अंगीकृत करावा असे आवाहन करतात. देवत्व नाकारून निर्भीडपणे विचारमांडण्याची, वास्तव स्वीकारण्याची त्याला भिडण्याची तयारी ठेवतात. चार्वाक, बुद्ध, संत तुकाराम, छ.शिवाजी महाराज, म.फुले, गाडगेबाबा यांच्या विचारांची परंपरा सांगतात. शेटजी (भांडवलशाही), भटजी (ब्राह्मणशाही) यांची व्यवस्था निर्भीडपणे नाकारतात. नव्हे उखडून फेकण्याचे बाळकडू देतात.
सद्या प्रचंड व्यसनाधीन होऊन, बेधुंद होऊन, पर्यावरणाचा ऱ्हास करत,अविचारी पद्धतीने जयंती, पुण्यतिथी, बाबासाहेबांनी संघर्ष केलेले अनेक ऐतिहासिक दिवस साजरे केले जात आहेत.
बाबासाहेबांना देवत्व बहाल करून स्वतःची कर्तव्यातून सुटका करुन घेतली जात आहे. तेच शिवाजी महाराज, आणि इतर महापुरुष-महान स्त्रिया यांच्या बाबतीतही घडत आहे. आज गरज आहे, वास्तव स्वीकारुन या महापुरुषांना-महामानवांना देवत्व बहाल करण्यापेक्षा त्यांनी सांगितलेल्या विचारांनी कृती करण्याची, जबाबदारीने वागण्याची !!
अत्यंत सुंदर मानवी जीवन असणाऱ्या नवीन समाज निर्मितीसाठी त्यांच्या विचारांची पेरणी करण्याची..!!
शहीद भगतसिंग यांच्या शब्दात सांगायचे तर … प्रगतीसाठी परिवर्तनाची इच्छा आणि आकांक्षा मनुष्यजातीचा आत्मा क्रांतीच्या या भावनेने सतत ओतपोत भरलेला असायला पाहिजे..! याची प्रचिती महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशोगाथेतुन नक्कीच येते.
रिडल्स इन हिंदुइझम, शूद्र पुर्वी कोण होते ? क्रांती-प्रतिक्रांती यातून व्यवस्थेत भेद कसे आणि कोणी निर्माण केले याचा धांडोळा घेतात. जनावरांपेक्षा घाण(वाईट) वागणूक माणसांना दिली जाते. अशा हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी शपथ घेऊन थांबत नाहीत तर मनुस्मृती चे दहन करून 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे हजारो अनुयायांना सोबत घेऊन बुद्ध धम्माचा स्वीकार करतात.
राज्य आणि अल्पसंख्यांक यातून राज्याला मार्गदर्शक गोष्टी सुचविलेल्या आहेत. यामध्ये सगळे महत्वाचे उद्योगधंदे, महत्वाचे कारखाने, जमीन सरकारी मालकीची असावी. याचा आग्रह आहे. सदयस्थिती पाहिल्यावर याचे महत्व पटते. सगळे महत्वाचे उद्योगधंदे, महत्वाच्या संस्था, कंपन्या यांचं खाजगीकरण केलं जात आहे. आणि त्याचा परिणाम देशातील जनता भोगत आहे. पेट्रोल, डिझेल, रॉकेल, गॅस, तसेच जीवनावश्यक गोष्टी यांच्या गगनाला भिडलेल्या किंमती, बेकार, बेरोजगार तरुण आणि उद्धवस्त होत असलेले कामगार, शेतकरी आणि शेतमजूर.
शासनकर्ते, सत्ताधारी यांचे धोरण प्रक्रियेतील, आणि राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक बदलातील महत्व ओळखून, बाबासाहेब मागासवर्गीय समाजातील (प्रचंड मोठी शक्ती असलेल्या) तरुणांना आवाहन करतात की सत्तेत महत्वाच्या जागा, महत्वाची स्थाने बळकावा. अभ्यास आणि संघर्षाने समाजहिताचे, माणूसहिताचे महत्वपूर्ण बदल करा.
वर्तमानपत्र,साप्ताहिक, मासिके स्वतः चालवली, तसेच ग्रंथालय, कॉलेजेस सुरू केली. संस्था, संघटना, पक्ष उभारले, प्रचंड मोठी परिवर्तनाची चळवळ उभी केली. या सर्व कार्याचा आढावा घेतला तर किती दूरदृष्टी या सगळ्यामध्ये होती याची जाणीव होते. देशातील “हम दो हमारे दो” च्या या जमान्यात रामजी आणि भीमाबाईच्या च्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे जन्मलेले हे 14 वे अपत्य भारतासारख्या जातीव्यस्थेच्या प्रचंड दलदलीत फुललेलं डॉ.बाबासाहेब नावाचं कमळ नक्कीच महामानव आहे. आणि या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाचा जीवनसंघर्ष एक अप्रतिम, प्रेरणादायी, कृतिशील, आणि कृतीप्रवन करणारी यशोगाथाच आहे.
– विलास साबळे, जुन्नर
vilassabale15@gmail.com