Friday, May 17, 2024
Homeविशेष लेखविशेष : मातृदिन

विशेष : मातृदिन

सकाळी उठल्यावर अचानकच तिला आपल्या प्रकृतीत काही तरी बिघाड होत आहे असे जाणवू लागले. काहीशी कमजोरी आणि डोळ्यासमोर अंधारी आली. लगेचच तिला तिच्या नवऱ्याने दवाखान्यात नेले. तिथे तिच्या तपासण्या करण्यात आल्या. आणि तातडीने उपचार सुरू झाले. काही तपासण्याचे रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येणार होते. तोपर्यंत आलेल्या रिपोर्ट प्रमाणे उपचार डॉक्टरांनी सुरू केले होते. सलाईन, इंजेक्शन दिले होते. औषधांमुळे तिला झोप लागली. 

” आई …ये आई उठ न. हे बघं मी तुला जेवण करून आणले आहे.” तिच्या अंगावर लहान लहान हाताने कोणीतरी स्पर्श करून हलवत उठविण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे ती एकदम खडबडून जागी झाली. बघते तर समोर लहान म्हणजे अगदी १० वय वर्षाचा मुलगा आपल्या एका हातात डबा घेऊन उभा होता. त्याला बघून तिने आपले डोळे पुन्हा बंद केले. पुन्हा त्या मुलाने ” ये आई उठ न .बघं किती वेळ झाला. तुला भूक लागली असेल‌. ही तुझी रोजची जेवणाची वेळ आहे. डॉक्टरांनी पण जेवण द्या लवकर म्हणून सांगितले आहे. आणि ही बघ राणी पण भुकेली झाली आहे. तिला पण चारायचे आहे मला. आता तू नाही चारू शकणार तिला.” 

हे ऐकताच तिने तिचे भरलेले डोळे हळूहळू उघडले आणि  त्या मुलांचा हात हातात घेऊन रडू लागली. आणि म्हणाली “बाळा माफ कर मला. मी खरंच खुप वाईट आहे. मी तुला कधीच प्रेम केले नाही. सवतीचा मुलगा म्हणून फक्त आणि फक्त घृणा केली. तुला कधी वेळेवर जेवण दिले नाही. ताजे तर अन्न तुला मिळालेच नाही. याउलट राणीचे उष्टे अन्न दिले मी. आणि तुझ्या बाबांना पण तुझ्या विरूद्ध काही तरी खोटे सांगून कित्येक रात्री उपाशी झोपवले. आणि एकदा तर तू भुकेने व्याकूळ होऊन खाण्यासाठी बिस्कीट डब्यातून काढून घेतला तर त्या हातावर मी चटका दिला. आणि आज त्याच हाताने तू जेवण बनवून आणलास माझ्या साठी. मला माफ कर बाळा. मी तुझी गुन्हेगार आहे. याचीच शिक्षा म्हणून मी इथे आहे बघं आज. ” म्हणत ती रडू लागली. 

हे ऐकून त्या मुलाने तिचे डोळे पुसले आणि डब्यातील दुधभात तिला चारु लागला. आज हे त्याच्या आईने त्याला गर्भात असताना केलेले संस्कार आणि तिची ममता त्याच्या मनात भरलेली होती.

आज तिला तो दुधभात पंचपक्वांन भासू लागला होता. आईचे जेवण झाल्यावर त्याने आपल्या छोट्या बहीणीला भात चारला. हे दृश्य पाहून आई वडील दोघेही आपल्या अश्रूंना थांबवू शकले नाही.

त्या दोघांना त्या बाळाच्या चेहऱ्यावर एका निरागस ममता माई आईचे तेज ओसंडून वाहत आहे हे दिसू लागले. खऱ्या अर्थाने हाच मातृदिन साजरा झाला.

– परवीन कौसर, बेंगलोर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय