Tuesday, May 7, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख:गिधाडे:निसर्गातील 'स्वच्छता दूत' पक्षी कुठे गेले

विशेष लेख:गिधाडे:निसर्गातील ‘स्वच्छता दूत’ पक्षी कुठे गेले

पूर्वी एखाद्या गावात मृत जनावर गावाबाहेर टाकल्यावर तिथे काही तासांतच शेकडोंच्या संख्येने गिधाडे उतरत असत.एकदोन तासांत सर्व काही सफाचाट करून टाकत.हेच काम भटकी कुत्री आणि जंगली जनावरेसुद्धा करतात;पण हे काम करण्याची त्यांची क्षमता गिधाडांच्या तुलनेत फारच कमी असते.याखेरीज हे मांस रोगयुक्त असले, तरी ते सहजासहजी पचवण्याची क्षमता फक्त गिधाडांमध्येच पाहायला मिळते.गिधाडे अतिशय उंचावर सतत घिरट्या घालत फिरत असतात आणि इतक्या उंचावरून या गिधाडांना रानात, माळावर पडलेल्या मृतदेहांचा पत्ता अचूकपणे लागतो आणि बघताबघता ती त्या ठिकाणी सर्वांत प्रथम हजर होतात.

भारतात एकेकाळी गेल्या 15 ते 20 वर्षांपर्यंत गिधाडांची संख्या चांगली होती परंतु 1980 च्या दशकापासून त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे.ती इतकी कमी झाली आहे की आता गिधाडे भारतातून नामशेष होणार की काय अशी भीती पक्षी निरीक्षकांना व पक्षीप्रेमींना वाटते आहे. गिधाडांची कोणी शिकार करत नाही.भारतात पाळीव प्राण्यांची संख्या भरपूर असल्याने त्यांचेया खाद्य कमी पण झालेले नाही. त्यांच्या लोकसंख्येला मुख्य फटका बसला आहे ते औषधे व रसायनांमुळे. पाळीव प्राण्यांना डायक्लोफिनॅक नावाचे औषध देतात.औषध घेतलेले असे मेलेले प्राणी खाल्यामुळे गिधाडांमध्ये ते औषध जाते.त्यामुळे गिधाडांच्या शरीरात अनेक व्याघी होतात व ती मरतात.


गिधाडे सुंदर नाहीत आणि ते मृतदेह खात असल्याने सामान्य माणसाला त्यांच्याबद्दल तिरस्काराची भावना असते.परंतु निसर्गातील अत्यंत महत्त्वाचे काम ते करत आहेत. गिधाडे नसतील तर मृतदेह सडून रोगराई पसरण्याचा धोका असतो.गिधाडे ही नैसर्गिकरीत्या कचरा निर्मूलन करणारी एक महत्त्वाची प्रजाती आहे.भारत सरकारने या औषधांवर बंदी आणलेली आहे आहे.

रामायणातील सीतेला वाचवण्यासाठी रावणाशी दोन हात केलेला “जटायू’ गिधाड आपल्या सर्वांनाच माहिती आहे. महाराष्ट्रात सध्या गिधाड दिसणे म्हणजे दुर्मिळ घटना होऊन बसली आहे. महाराष्ट्रात नोंद झालेल्या ५८० पेक्षा अधिक पक्षी प्रजातींपैकी किमान ६२ प्रजाती संकटग्रस्त आहेत. त्यामध्ये गिधाडांचाही समावेश आहे. निसर्गात ‘स्वच्छता दूत’ म्हणून ओळख असणारे गिधाड पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्रात वन विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही अवस्था ओढवली असल्याचे या क्षेत्रातील संशोधक,अभ्यासक, गिधाड मित्र आणि वन्यजीव क्षेत्रातील डॉ. अजय पोहरकर यांचे म्हणणे आहे.


ज्याप्रमाणे सागरी कासवांना समुद्राचे स्वच्छता कर्मचारी म्हटले जाते तसेच जमिनीवरील ‘स्वच्छता दूत’ म्हणजे गिधाड. अन्नसाखळी ही एकमेकांवर अवलंबून आहे. यातील एकही घटक निखळला तर अन्नसाखळी ढासळण्याची शक्यता असते. गिधाडही या अन्नसाखळीतील दुसऱ्या जीवांवर अवलंबून असणारा पक्षी आहे. कारण ते केवळ मेलेल्या प्राण्यांच्या मृतदेहांवर उदरभरण करतात. म्हणून त्यांना ‘मृतभक्षक’ म्हणतात. जगभरात गिधाडांच्या २३ प्रजाती आढळतात.

पक्षी निसर्गचक्रातील महत्वाचे घटक आहेत.

कित्येक जण विचारतात की, आपल्याला पक्ष्यांचा उपयोग काय? आपला परिसर निरोगी ठेवण्यासाठी पक्षी उपयुक्त ठरतात.आर्थिकदृष्ट्यादेखील त्यांचे महत्त्व कमी लेखता येणार नाही.शेतातील पिकांवर पडणाऱ्या किडीवर ते नियंत्रण ठेवतात. उपद्रवी अशा उंदरांवर व घुशींवर काही पक्षी उपजीविका करत असल्याने ते शेतीसाठी उपकारक ठरतात. घुबडाची एक जोडी कीटक आणि उंदरांपासून १ हेक्टर शेतजमिनीचे रक्षण करते. याशिवाय पक्षी फुलांचे परागीकरण आणि बियांचे स्थलांतर करतात.गावातील मृत झालेले कीटक, सरपटणाऱ्या आणि कुरतडणाऱ्या मेलेल्या प्राण्यांचे अवशेष खाऊन कावळे ही घाण नाहीशी करतात.छोटे मोठे पक्षी किंवा उंच झाडावर असणारी गिधाडे खूप महत्वाची आहेत.


घारी व गिधाडे मृत जनावरांवर तुटून पडतात. एक प्रकारे हे सर्व पक्षी घाण नाहीशी करण्यात साहाय्यच करतात.परंतु शहरातून किंवा खेडेगावातून या सर्व पक्ष्यांची- मुख्यत्वेकरून घाण, मेलेली जनावरे नाहीशी करून निसर्गाचा समतोल राखण्याचे काम करणाऱ्या गिधाडांची- संख्या हल्ली कमी होऊ लागली आहे. त्याला कारणही तसेच आहे, ते म्हणजे “डायक्लोफिनॅक’ या मानवांमध्ये व जनावरांमध्ये वेदनाशामक म्हणून वापरल्या जाणाऱ्या औषधांचा अतिरेकी वापर. ही औषधे घेऊन अनेक गायी-गुरांसारखे प्राणी मरतात व त्यांचे सांगाडे, मांस गिधाडांच्या खाण्यात आल्यावर तीदेखील मृत्युमुखी पडतात, किंवा जे पक्षी जगतात ते प्रजोत्पत्ती करू शकत नाहीत.
आपल्या भारतात “पांढरपाठी गिधाड, राज गिधाड, युरेशियन गिधाड, हिमालयीन ग्रिफोन, पांढरे गिधाड (इजिप्शियन गिधाड), काळे गिधाड (सिनेरियस गिधाड), लांब चोचीचे गिधाड या जाती आढळून येतात.

गिधाडे हे मृतभक्षक वर्गातील पक्षी आहेत. हे अंटार्क्टिका व ओशनिया खंड वगळता सर्वत्र आढळतात. पिसे नसलेले केस विरहित डोके हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. रक्त वा इतर द्रव्यांनी अस्वच्छ होऊन पुन्हा स्वतःला स्वच्छ करणे अवघड असल्याने हा बदल त्यांच्यात निसर्गाने घडवला असावा. निसर्गातील सफाई कामगार आहेत, तशीच ती अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवाही आहेत. नैसर्गिक उत्क्रांतीमध्ये त्यांच्या शरीरात अनेक बदल झाले आहेत. त्यांची ठेवण शिकारी पक्ष्यासारखी (लांब बाकदार चोच, टोकदार नखे, इत्यादी) जरी असली तरी त्यांना शिकार करण्याचे कौशल्य फारच कमी असते.डोक्यावर पिसे नसल्याने त्यांना मृतदेहाच्या आत डोकावून मांस खाणे सोपे जाते.
गिधाडे नसलेल्या भागात मृतदेह नैसर्गिकदृष्ट्या कुजण्यास तीन ते चार पट जास्त वेळ लागतो. गेल्या वीस वर्षांत वेगवेगळ्या कारणांमुळे गिधाडे धोक्यात आल्याने संरक्षित जागेत नैसर्गिक अधिवासासारखी स्थिती निर्माण करून (एक्ससिटू कॉन्झर्व्हेशन) त्यांची संख्या वाढविण्यावर यापुढे भर द्यावा लागणार आहे. ’
गिधाड हा पक्षी गरुड या पक्ष्यापेक्षाही मोठा आणि ताकदवान असतो, तरीही तो शिकार न करता प्राण्यांच्या मृत शरीराची विल्हेवाट लावून आपले पोट भरत असतो.
हे सर्व जण कोणताही पगार वा बोनस न घेता, तसेच केव्हाही सुट्टी न घेता; निसर्ग स्वच्छ ठेवण्याचे कामइमानेइतबारे करत असतात. मनुष्य असो वा इतर प्राणी, त्यांच्या मृतदेहांची योग्य रितीने विल्हेवाट लावणे फार महत्त्वाचे असते. अन्यथा, रोगराई पसरण्याची दाट शक्यता असते. प्राण्याच्या मृतदेहांची विल्हेवाट लावून रोगराई रोखण्याचे काम आजतागायत समर्थपणे करून या गिधाडांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले होते. गिधाडांच्या या निसर्गॠणाचा उल्लेख ज्ञानेश्वर, तुकाराम अशा सर्वच संतांनी त्यांच्या साहित्यामध्ये जागोजागी केल्याचे दिसून येतेे.


गिधाड संवर्धन सुरू आहे,पण मोठे आव्हान आहे

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी द्वारे संचालित पिंजोर (हरयाणा) येथील ‘गिधाड प्रजनन व संशोधन केंद्रा’तून पांढऱ्या पाठीचे १० गिधाड पक्षी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले आहे. साधारणत: ३ महिन्यानंतर या गिधाडांना निसर्गात मुक्त करण्यात येणार आहेत. सध्या १० गिधाड पक्षी असून यानंतर त्याची संख्या २० आणि पुढे ४० करण्यात येणार आहे.

भारतात गिधाडाच्या ९ प्रजाती आढळतात. १९९० साली गिधाडांची संख्या चार कोटी होती. आता ती संख्या कमी होऊन केवळ ५० हजारांवर आली आहे.गिधाडे नष्ट होण्यास डाईक्लोफिनेक नावाचे रसायन कारणीभूत असल्याचे संशोधनाअंती सिध्द झाले आहे. पाळीव गुरांना देण्यात येत असलेल्या औषधामध्ये या रसायनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता,आता या औषधावर भारत सरकारने बंदी आणली आहे.

महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश,त्रिपुरा,कर्नाटक आणि तामिळनाडू येथे गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्रांसाठी हिरवा कंदील मिळाला आहे. गिधाड संवर्धन 2020-2025 करिता कृती आराखड्यात तशी तरतूद करण्यात आली आहे.राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने या आराखड्याला मान्यता दिली आहे. नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या हरियाणा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि आसाम या चार राज्यांत प्रजनन केंद्रे आहेत. या चार प्रजनन केंद्रांमध्ये ७५० गिधाडे निसर्गमुक्त होण्यासाठी तयार आहेत.

गिधाडांच्या संवर्धन आणि प्रजननासाठी महाराष्ट्रातील पहिला संवर्धन प्रकल्प पुणे जिल्ह्यात सुरू होत आहे.वन विभाग आणि इला फाउंडेशन यांच्यामध्ये या प्रकल्पासाठी नुकताच दहा वर्षांचा करार झाला आहे.पुण्यापासून ६० किलोमीटर अंतरावर जेजुरीजवळ पिंगोरी गावामध्ये केंद्र उभारणी सुरू झाली आहे.वर्षभरात केंद्र कार्यान्वित होणार असून, तिथे महाराष्ट्रातील ‘गिप्स बेंगालेन्सिस’ आणि ‘गिप्स इंडिकस’ या दोन प्रजातींचे संवर्धन करण्यात येणार आहे.महाराष्ट्र वन विभाग व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ताडोबातील बोटेझरी येथे ‘जटायु संवर्धन राज्यस्तरीय प्रकल्पा’चे कार्य सुरू आहे.सरकार,निसर्ग प्रेमी स्वयंसेवी संस्था यांच्यासमोर गिधाड संवर्धन हे खूप मोठे आव्हान आहे.

क्रांतिकुमार कडुलकर-पिंपरी चिंचवड

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय