Saturday, May 18, 2024
Homeबॉलिवूड'नवरदेव बी.एस्सी. अ‍ॅग्री' शेतकरी नवरदेवाची गोष्ट

‘नवरदेव बी.एस्सी. अ‍ॅग्री’ शेतकरी नवरदेवाची गोष्ट

शेतकरी राजाची मातीशी असणारी घट्ट नाळ, त्याच मातीतून पीक उगवण्याची तळमळ आणि त्याच शेतीमुळे त्याचं न जमणारं लग्न या विषयाला हात घालणारा चित्रपट ‘नवरदेव बी.एस्सी. अ‍ॅग्री’ प्रदर्शित झाला असून हा चित्रपट राम खाटमोडे यांनी दिग्दर्शित केला आहे.एका गंभीर सामाजिक प्रश्नाला हलक्या-फुलक्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर ठेवण्याचे काम या चित्रपटातून करण्यात आले आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना क्षितीश म्हणाला, हा चित्रपट राम खाटमोडे आणि विनोद वणवे या माझ्या दोन मित्रांनी केला आहे. त्यांचा या चित्रपटासाठी लेखन आणि दिग्दर्शन करण्याचा हा पहिला प्रयत्न आहे. त्यामुळे समवयीन कलाकार असल्यामुळे मस्ती मज्जा करत सहजरीत्या हा चित्रपट तयार झाला. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या निमित्ताने मी एक निराळं पात्र साकारलं. चित्रपटासाठी ग्रामीण भाषेचा अभ्यास करता आला. आम्ही भोर येथे या चित्रपटाचे चित्रीकरण केले, त्यामुळे तेथील स्थानिक लोकांसोबत बोलून या ग्रामीण बोलीभाषेचा अभ्यास केला. तसेच शेतीबद्दल अजून महिती करून घेता आली. ट्रॅक्टर चालवला, पेरणी आणि फवारणी केली. यामुळे शेतकऱ्याचं भावविश्व जाणून घेण्यास मदत झाली. या चित्रपटात दु:खी शेतकरी न दाखवता सुखी आनंदी शेतकरी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.


या चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, ‘फुलराणी’ या चित्रपटानंतर हा माझा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा जेवढी गंभीर आहे तेवढाच हा चित्रपट मनोरंजन करणारा आहे. मी सुकन्या नावाचं पात्र साकारलं आहे. ती गावाकडे वाढली आहे, तिला शहराचं फारसं आकर्षण नाही. तरीही ती परखडपणे आपलं मत व्यक्त करणारी मुलगी आहे. तिचं हेच वैशिष्टय़ मला अधिक भावलं.

क्षितीश दातेसोबत पहिल्यांदाच चित्रपटात काम करतानाचा अनुभव सांगताना प्रियदर्शिनी म्हणाली, मी आणि क्षितीश फार जुने मित्र आहोत. त्यामुळे एकमेकांना पूर्वीपासून ओळखत असल्यामुळे सहजरीत्या आम्ही काम करत होतो. या चित्रपटाचे चार सीन शूट करून झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशीच तो मला मागणी घालतो असं दृश्य होतं. त्यामुळे आम्ही थेट एक दृश्य चित्रित केल्यामुळे आणखी मज्जा आली आणि अगदी हसत खेळत पद्धतीने चित्रीकरण करत चित्रपट पूर्ण झाला.

‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ आणि ‘नवरदेव बीएस्सी अ‍ॅग्री.’ चित्रपटातून काय शिकायला मिळालं याबद्दल सांगताना क्षितीश दाते म्हणाला की, हे तीनही वेगळय़ा प्रकृतीचे चित्रपट आहेत. ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘नवरदेव बीएस्सी अ‍ॅग्री.’ या तिन्ही चित्रपटांत शेती हा एक विषय सारखा असला तरी ‘मुळशी पॅटर्न’ हा शेतीत पैसा नाही म्हणून गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणांवर आधारित चित्रपट होता. तसेच ‘धर्मवीर’ हा राजकीय विषयावर आधारित चित्रपट आहे आणि ‘नवरदेव बीएस्सी अ‍ॅग्री.’ हा तरुण शेतकऱ्यांचे लग्न होत नाही या विषयावर आधारित चित्रपट आहे.

त्यामुळे हे तिन्ही चित्रपट करताना मला वेगवेगळय़ा विषयांवर काम करता आले. नवीन गोष्टी शिकता आल्या. तसेच तिन्ही चित्रपटात सलगता असलेलं पात्र मला करता आलं. मुळशी पॅटर्नमध्ये प्रवीण तरडे यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. तर, धर्मवीर या चित्रपटामुळे मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पात्र साकारायला मिळाले. तसेच मुंबई ठाण्यातील राजकारणाबद्दल माहिती झाली. अशाच प्रकारे मला या तिंन्ही चित्रपटांतून वेगवेगळय़ा प्रकारची पात्रं साकारायला मिळाली.

या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला अनेक शेतकरी तरुण येऊन भेटले. ही कथा आपली असल्याचे त्यांनी सांगितलं. असे अनेक शेतकरी तरुण आहेत, त्यांनी तीस-पस्तीस वय वर्ष ओलांडले असूनही त्यांचे लग्न झालेले नाही. अनेक शेतकरी तरुणांची दहा एकरहून अधिक शेती आहे. घरची परिस्थिती चांगली आहे, पण केवळ शेतकरी असल्यामुळे लग्नासाठी मुलगी देत नाही, अशी खंत आजही तरुण शेतकऱ्यांना भेडसावत आहे, असे मत क्षितीशने व्यक्त केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय