Tuesday, June 18, 2024
Homeताज्या बातम्याविशेष लेख : एनडीएकडे बहुमत मात्र इंडियाकडेही जनमत

विशेष लेख : एनडीएकडे बहुमत मात्र इंडियाकडेही जनमत

NDA majority : अठराव्या लोकसभा निवडणुकांचे निकाल काल लागले. आज दिल्लीमध्ये एनडीए (NDA majority) आणि इंडिया आघाडीच्या बैठका सुरु आहेत. राजकारण कोणत्या वळणाने जाईल हे पहावे लागेल. लोकसभा निवडणुकांचे जे निकाल आले आहेत त्याचे वर्णन एनडीए आघाडीला बहुमत मात्र इंडिया आघाडीकडेही जनमत असेच करावे लागेल.भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता न आल्याने आघाडी धर्माचा स्वीकार करणे अपरिहार्य आहे. कारण गत निवडणुकीत भाजपला एकट्याला ३०३ जागा मिळालेल्या होत्या. त्यामध्ये या यावेळी ६० -६५ जागांची घट झालेली आहे. आणि गत वेळी पन्नाशीत अडकलेल्या काँग्रेसला शंभर जागा मिळाल्या आहेत. शिवाय समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्रमुक यांच्यासह शिवसेना (ठाकरे गट),राष्ट्रवादी (शरद पवार गट), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पक्ष आदी इंडीया आघाडीतील भाजपा विरोधी अन्य सर्वांनाही एकशे चाळीसवर जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा जेमतेम पार करण्यात आलेले यश आणि विरोधकांना चांगल्या प्रकारे विस्ताराची संधी या निकालाने दिलेली आहे असे दिसते. नव्या संसदेच्या नव्या सभागृहात कायम हवेत राहणारा रथ जमिनीवर येईल. आणि हवेतल्या प्रश्नांपेक्षा जमिनीवरचे प्रश्न महत्त्वाचे असतात त्याचा विचार करत जा असा संदेशही दिला गेला आहे. ओडिसात नवीन पटनाईक यांचा पराभव आणि आंध्रात चंद्रबाबूंचे पुनरागमनही या निकाला बरोबरच स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीचे राज्यनिहाय आणि आकडेवारीनिशी विश्लेषण स्वतंत्रपणे करावे लागेलच. (NDA majority)

ही १८ वी लोकसभा निवडणूक १९ एप्रिल ते १जून या कालावधीत सात टप्प्यात झाली. या निवडणुकीत सर्व पक्ष आणि अपक्ष मिळून तब्बल ८३६० उमेदवार उभे होते. त्यापैकी ७९७ महिला उमेदवार होत्या. अर्थात महिला आरक्षण विधेयक ,नारीवंदन वगैरे ची भाषा व चर्चा सातत्याने सुरू असते. पण निवडणुकीत प्रत्यक्ष तिकीट देण्याचे प्रमाण आणि निवडून येण्याचे प्रमाण याही वेळी महिलांच्या बाबत दहा टक्केही नाही हे दिसून आले. याचाही गांभीर्याने विचार सुदृढ राजकारणाची चर्चा करत असताना करण्याची गरज आहे.

१९६२ नंतर सलग तिसऱ्यांदा संधी मिळालेले हे सरकार आहे याचा उल्लेख मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.ते खरेही आहे. मात्र त्याचवेळी हेही लक्षात घेतले पाहिजे की १९६२ ला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला लोकसभेच्या एकूण ५०८ पैकी३६१ जागा व जवळपास ४५ टक्के मते मिळालेली होती. मात्र या निवडणुकीत पंतप्रधान मोदी चारसो पार, तिनसो सत्तर, तिनसो पार वगैरे प्रचाराच्या टप्प्याप्रमाणे आकसत गेलेले आकडे तर सोडाच तर स्वपक्षाला पूर्ण बहुमतही मिळवून देऊ शकलेले नाहीत हे वास्तव आहे. त्यामुळे या निवडणुकीने मोदींना आता ‘ हम करे सो कायदा ‘ न करता आपणही एनडीए आघाडीचे घटक आहोत आणि आघाडीतील इतर पक्षांचेही मत विचारात घ्यावे लागेल. तसेच आपल्या अन्य पक्षातील सहकारी मंडळींप्रमाणेच स्वपक्षातीलही मंडळींना सन्मानाने वागवावे लागेल. मोदींच्या मंत्रिमंडळातील १९ मंत्र्यांचा पराभव झाला आहे .त्याची जबाबदारी मोदी व शहानाच घ्यावी लागेल. कारण यश मिळालं तर व्यक्तिगत आणि अपयश आलं तर सामूहिक असं असू शकत नाही. (NDA majority)

भाजपमधीलही अनेकांना मोदींची व अमित शहांची मनमानी पटत नसावी पण त्यांचा पूर्ण बहुमतामुळे आणि विरोधात बोलले तर संपवण्याच्या भीतीपोटी नाईलाज झाला होता. पण या निकालाने मोदी व शहाना भाजपच्या अंतर्गत सुद्धा आता जाब विचारणारा एक वर्ग तयार होऊ शकतो यात शंका नाही. आता भाजपला संघाच्या मदतीची गरज नाही हे जे.पी. नड्डा यांच्या तोंडून वदवले गेलेले वाक्य पुन्हा उच्चारता येणार नाही. कारण लोकांनी दिलेला हा कौल राजकारणात सर्वसमावेशकता स्वीकारण्यासाठीचा आहे .किमान समान कार्यक्रमाचा विचार करायला लावणारा आहे. समान नागरी कायद्यापासून एक देश एक निवडणूक आदी अनेक धोरणांचा आग्रह करताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांना विचारात घ्यावे लागेल. तसेच राज्यघटना आणि तिचे तत्त्वज्ञान याची मोडतोड कोणालाही करता येणार नाही, ती मूल्ये कोणालाही पातळ करता येणार नाहीत असाही हा जनादेश आहे.

गेल्या दहा वर्षात स्वायत्त संस्थांचा, तपास यंत्रणांचा ज्या विकृत पद्धतीने वापर केला तो यापुढे इतक्या मुक्त व निर्लज्जपणे करता येणार नाही. कारण जनता असल्या खुनशी , अहंकारी, मनमानी राजकारणाला विटलेली आहे. तिला बोलघेवडा नव्हे तर खरा विकास हवा आहे. तिला मुस्लिम मंगळसूत्र आदी फालतू मुद्यांपेक्षा रोजगाराची व्यापकता आणि महागाईची कमतरता हवी आहे. भावनिक राजकारणाच्या मर्यादा असतात. धर्म व अध्यात्म ही निखळ व्यक्तिगत बाब असते. लोकांना पारलौकिक माया नव्हे तर ऐहिक जीवनातील प्रश्न महत्त्वाचे असतात. सत्ताधाऱ्यांनी त्याचा विचार करावा. असाही संदेश या निवडणुकीतून मिळालेला आहे.या निवडणुकीने काँग्रेसमुक्त आणि विरोधी पक्ष मुक्त भारत करण्याचे लोकशाहीशी विसंगत व हुकुमशाहीच्या जवळ जाणारे स्वप्न उध्वस्त केले आहे . या निकालानंतर अनेक ठिकाणी प्रादेशिक पक्ष बळकट झालेले दिसून येत आहे. ते पक्ष तोडून फोडून फार काळ राजकारण करता येत नाही असाही संदेश या निवडणुकीने दिलेला आहे. एक मजबूत विरोधी पक्ष या निवडणुकीने आणलेला आहे. (NDA majority)

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधानांनी दोनशेवर सभा आणि रोडशो केलेली ही निवडणूक होती. ‘ जिसने राम को लाया है हमे उनको लाना है ‘यापासून ‘ माझा जन्म झाला नाही तर मला परमेश्वरानेच पाठवलेले आहे ‘यासारख्या बालिश आणि प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट करणाऱ्या विधानांचा जनतेवर सकारात्मक परिणाम होत नसतो असेही या निकालात दिसुन आले.या निवडणुकीत खुद्द अयोध्या आणि त्या परिसरातील पाच जागा भाजपला गमवाव्या लागल्या आहेत. तेथे तीन ठिकाणी समाजवादी पक्ष तर दोन ठिकाणी काँग्रेसचा विजय झालेला आहे. महाराष्ट्रासह अनेक देशभरात अनेक ठिकाणी मोदींनी जिथे जिथे प्रचार केला तिथल्या बहुतांश जागा भाजपने गमावलेल्या आहेत. खुद्द मोदींचे मागच्या निवडणुकीतील मताधिक्य साडेचार लाखांवरून दीड लाखांवर घसरलेले आहे .मतमोजणीच्या एका फेरीत तर ते मागे पडले होते हे वास्तव आहे. त्यामुळे मोदी करिष्मा आता भाजपला एक हाती विजय देऊ शकत नाही हे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच आता जनतेने आघाडी सरकारच्या माध्यमातून पुन्हा दिलेली संधी मोदीनी जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे अग्रक्रमाने लक्ष दिले पाहिजे हे सांगणारी आहे. प्रत्येक भाषणात १४०कोटी जनता आपल्या मागे आहे असा आभास निर्माण करण्याची गरज नाही.कारण यातील निम्म्याहुन कितीतरी मोठी संख्या आपली वैचारिक विरोधक आहे याचे भान ठेवले पाहिजे. आणि वैचारिक विरोधक म्हणजे राष्ट्रद्रोही नव्हे हेही लक्षात घेतले पाहिजे. त्याचबरोबर पंतप्रधान विशिष्ट पक्षाचा नसतो तर संपूर्ण राष्ट्राचा असतो या भावनेतून काम करण्याची गरज आहे.

गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत मोदी अजेंडा ठरवत असत आणि त्या अजेंड्यात विरोधक अडकत असत व पराभूत होत असत.पण या निवडणुकीत विरोधकांनी अजेंडा ठरवला आणि मोदी त्यात अडकत गेले. म्हणून तर त्यांना आपल्या जाहीरनाम्यापेक्षा काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर भाष्य करावे लागले. एक्झिट पोलचे अंदाज पूर्णतः चुकले. निवडणुकीचे निकाल जाहीर होऊ लागले तसे शेअर बाजार कोसळला गुंतवणूकदारांचे ३१ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले याची जबाबदारी कोणाची ? याचाही विचार होण्याची गरज आहे तसेच इंदूरमध्ये तब्बल दोन लाखाहून अधिक लोकांनी नोटाचे बटन दाबले. ते का व कुणामुळे झाले हेही लक्षात घेतले पाहिजे.

एक गोष्ट स्पष्ट आहे भारतीय लोकशाहीमध्ये मतदार नेहमीच विचारपूर्वक मताधिकार बजावतात. एखादा नेता स्वतःला पक्षापेक्षा आणि देशापेक्षा मोठा मानायला लागला तर त्याला ते बरोबर खाली आणतात. ते अहंकाराला आणि तुच्छतावादालाही थारा देत नाहीत. या निवडणुकीत भाजपला मतदारांनी नाकारले असे अजिबात म्हणता येणार नाही.पण भाजपला हातामध्ये घेऊन मोदी व शहा ज्या पद्धतीने वाटचाल करत होते त्या हुकूमशाही विकृतीला नाकारलेले आहे. विरोधकांबरोबरच पक्षांतर्गत सबलांचे पाय छाटण्याची जी विकृती आहे तिला नाकारलेले आहे. भाजपने दक्षिणेत केलेल्या प्रयत्नांना निश्चितच काही अंशी यश आलेले आहे. पण त्याचवेळी उत्तरेतील लोकांना सातत्याने गृहीत धरणे योग्य नाही हेही दाखवून दिले आहे. इंडिया आघाडीनेही पूर्वीच्या अनेक चुका टाळत एक दिलाने व एकमुखाने जी प्रचार यंत्रणा राबवली, जे तिकीट वाटप केले त्यामुळे त्यांनाही चांगल्या पद्धतीचे यश मिळालेले आहे. आगामी काही महिन्यात महाराष्ट्र, झारखंड ,दिल्ली, हरियाणा आदी राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. त्यातही एकसंघ पद्धतीने जर इंडिया आघाडी लढली तर त्यांना चांगले यश मिळू शकते.परिणामी पुढच्या काळात राज्यसभेचीही समीकरणे बदलू शकतात. अर्थात या निकालातून कोण कसा बोध घेतो आणि पुढील वाटचालीची आखणी करतो यावर पुढील राजकारण वळण घेणार आहे.

प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९०)
[email protected]

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार

मोठी बातमी : नरेंद्र मोदी यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, राष्ट्रपतीकडे सोपवला राजीनामा

मोठी बातमी : NEET परिक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल !

रायगड लोकसभेत सुनील तटकरे विजयी, अजित पवार गटाला केवळ एक जागा

नांदेड लोकसभेतून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी, भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकरांचा पराभव

कोल्हापूर लोकसभेतून शाहू महाराजांचा मोठा विजय, तर हातकणंगले मधून धैर्यशील माने विजयी

नाशिक लोकसभा मतदारसंघात राजाभाऊ (पराग) वाजे विजयी, हेमंत गोडसे यांचा पराभव

धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ.शोभा बच्छाव यांचा ३ हजार ८३१ मतांनी विजयी

ब्रेकिंग : राज्यातील सर्व विजयी 48 खासदार उमेदवारांची यादी, पाहा !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय