Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयधक्कादायक : माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे न्यायव्यवस्थेच्या विश्वासावर प्रश्न उपस्थित करणारे...

धक्कादायक : माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे न्यायव्यवस्थेच्या विश्वासावर प्रश्न उपस्थित करणारे विधान

नवी दिल्ली – माजी सरन्यायाधीश आणि भाजपचे राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांनी भारतीय न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे. तसेच न्यायालयात न्याय मिळणं दुरापास्त झाल्याचे वक्तव्य केले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात गोगोई बोलत होते. गोगोईंनी यावेळी अनेक विषयांवर भाष्य केले.

मला विचारले तर न्यायालयात मी कोणत्याही गोष्टीसाठी अजिबात जाणार नाही. न्यायालयात जाणे म्हणजे पश्चाताप करून घेण्यासारखे असल्यामुळे न्याय तुम्हाला मिळत नसल्याचे रंजन गोगोई यांनी म्हटले आहे. न्यायाधीश नेमले जातात, तेव्हा त्यांना प्रशिक्षणाची गरज असते. त्याची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे. निकाल कसा लिहावा, हे शिकवले जात नाही. कसे न्यायालयीन कामकाजात वागावे हे शिकवले जात नसल्याची खंत रंजन गोगोई यांनी व्यक्त केली आहे.

देशातील न्यायव्यवस्था इतकी जर्जर झाली आहे की न्यायालयातील न्याय हा सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेर गेला आहे. फक्त सधन व कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकंच न्यायालयाकडे जातात. त्यामुळे सध्या ज्या प्रकारची परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी या क्षेत्रातील लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशा शब्दात गोगोई यांनी न्यायव्यवस्थेला फटकारले आहे.

आपली न्यायव्यवस्था जर्जर झाली आहे. 2020 मध्ये न्यायव्यवस्थेसहीत सर्वच क्षेत्रातील कामकाज मंद झाले आहेत. याकाळात सेशन कोर्टात 60 लाख केसेस आल्या आहेत तर हायकोर्टात 3 लाख व सुप्रीम कोर्टात सहा ते सात हजार केस आल्या आहेत. त्यामुळे आता या सर्व केस सोडविण्यासाठी आपण एक रो़डमॅप तयार केला पाहिजे. न्यायपालिका प्रभावी केली पाहिजे. हे खूप महत्त्वाचे आहे’, असे गोगोई यांनी सांगितले आहे.

न्यायाधीशांची नेमणूक सरकारी अधिकारी नेमतात तशी होत नाही. कामासाठी योग्य व्यक्ती मिळणे महत्वाचे असते. पूर्ण काळ वचनबद्धता न्यायाधीशाची असते. कामाचे तास निश्चित नसतात. आम्ही रात्री 2 वाजता उठून काम केल्याचेही रंजन गोगोई यांनी म्हटलं आहे. दरम्यान, माजी सरन्यायाधिश असलेल्या रंजन गोगोई यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. न्यायव्यवस्थेवरचा विश्वास माजी सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्यामुळे कमी होण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय