Friday, May 17, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आमचं सेम असतं...

विशेष लेख : प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आमचं सेम असतं – कॉ. अभिलाष

“प्रेम म्हणजे प्रेम असत

तुमचं आमचं सेम असतं”

असं अनेकदा ऐकायला मिळत पण हे तितकसं माझ्याबाबतीत खरं वाटत नाही कारण एक समलिंगी व्यक्ती म्हणून या जगात समलिंगी प्रेम करणाऱ्यांना किती मोकळीकता मिळाली आहे आणि अद्याप मिळते हे खरंतर तपासून पाहायला हवे. इतिहासात अगदी Saint Valentine च्या काळापासून तर वर्तमानापर्यंत आपणाला हेच दिसून येत की मानव समाजात प्रेम करणे हे एक जणू गुन्हा केल्या सारखेच झाले आहे.

जगातल्या सगळ्याच तत्त्ववेत्त्यांनी सांगितले की प्रेम ही सहजिवनातली एक सगळ्यात सुंदर गोष्ट आहे पण दुर्दैवाने याचा लाभ हा काही विशिष्ट लोकांपुरतेच मर्यादित आहे, कारण ज्यांच्या जीवनात आयुष्यातल्या सगळ्या गरजा अगदी सहजतेने भागतात त्यांना त्यांचं प्रेम साध्य करण्यासाठी कुठलाच आटापिटा करावा लागत नाही, याउलट ज्यांना आपल्या दैनंदिन जीवनात दररोज आपल्या अस्तित्वासाठी झगडत रहावे लागते. सतत संघर्ष करावा लागतो त्यांना मात्र आपलं प्रेम मिळवता येत नाही.

मी या दूसऱ्या गटात मोडतो!

जिथे आपल्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतील तिथे आपल्या भावनांना समजून घेण्याची तसदी कोण घेईल? या धकाधकीच्या आयुष्यात आपण इतके बांधले गेलोय की आपल्याला आपलाच शोध घ्यायला वेळ नाही असो!

पण मी एका बाबतीत Lucky आहे की मी माझा शोध घेतला आणि स्वतः च्या जगण्याची एक नवी दिशा ठरवली व त्यानुसार वाटचाल सुरू केली. अनेक गोष्टींचे अनुभव घेत शेवटी एकदा प्रेम नावाच्या एक भावनात्मक जाळ्यात सापडलो. माझा प्रियकर हा उभयलिंगी (ज्याला इंग्रजीत Bisexuals) म्हणतात होता. त्याला स्त्री आणि पुरूष दोन्ही लिंगाची व्यक्ती आवडतात पण या समाजात भिन्न लैंगिकता असणाऱ्यांनाच समाजमान्यता प्राप्त होते आणि त्यांनाच संसार करण्याचा अधिकार आहे हीच समजूत बाळगून मी आणि माझा प्रियकर आम्ही दोघांनी कधीही आपले प्रेम उघडपणे व्यक्त केलेले नाही.

आपल्या आयुष्यात प्रेम ही जितकी सुंदर गोष्ट आहे ना ती तितकीच जबाबदारीची आहे याची जाणीव त्याला झाली आणि आम्ही दोघांनीही ठरवले की आपल्या नात्याला येथेच विराम द्यावा कारण समाजापुढे स्वतःला उभयलिंगी (Bisexual) अशी ओळख होऊ नये तसेच स्वतःला  भिन्नलिंगी (Heterosexual) व्यक्ती म्हणून समाजात आपली ओळख आणि स्थान प्राप्त व्हावे यासाठी माझ्यापुढे त्याने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

हे ऐकता क्षणी मला आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक की त्याशिवाय आपण एक क्षणही राहू शकत नाही त्या व्यक्तीने सामाजिक मानापमान खातर लग्न करायचय हे ऐकताच मला हे आयुष्य निरर्थक आहे की काय असं वाटायला लागलं. जेव्हा मी त्याला लग्नाचं कारण विचारलं कौटुंबिक वाद, समाजाच भय, बहिष्कार वगैरे नेमकं काय कारण आहे? त्यावर उत्तर देताना तो बोलला की “स्वतःला स्विकारयचं माझ्यात धाडस नाही” आणखी एक ते म्हणजे “मला माझं स्वतःच मुलं हवंय!” 

त्याच्या या इच्छेवर मात्र मी काहीच बोलू शकलो नाही, कारण समलिंगी संबंधांतून नैसर्गिकरीत्या पुनरुत्पादन होत नाही याची पुरेपूर कल्पना असल्याने तसेच आपल्यामुळे कुणाच्याही नैसर्गिक इच्छां वर गदा येऊ नये या साठीच मी त्याला माझ्या आयुष्यातून दूर केले.

जीवनात आलेला हा अनुभवाचं कधीही विस्मरण होणार नाही तसेच समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांच्या जीवनात समाज किती प्रमाणात आणि कुठे हस्तक्षेप करतो याचीही कल्पना आपणाला आलीच असणार.

खरंतर आपण म्हणताना म्हणतो की “प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं” पण यासोबतच म्हणताना असं म्हणावसं वाटतं की,

“हो प्रेम म्हणजे प्रेमच असतं 

पण

तुमचं आणि आमचं सेम नसतं.”

– कॉम्रेड अभिलाष

– पुणे

(लेखक हे LGBT कम्युनिटीतील कार्यकर्ते आहेत.)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय