Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणधक्कादायक ! 'आनंदाच्या शिधा'मध्ये 50 लाखांचा गडबड घोटाळा

धक्कादायक ! ‘आनंदाच्या शिधा’मध्ये 50 लाखांचा गडबड घोटाळा

पाथर्डी : गणेशोत्सव, दिवाळीसह विविध सणवार गरीब कुटुंबांनाही आनंदात साजरे करता यावेत, यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘आनंदाचा शिधा’ योजनेत पाथर्डी तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत लाखोंचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे पुढे आले आहे.रेशन दुकानदारांना पुरवठा शाखेकडून चार महिन्यांपासून ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यात आला. ‘त्याचे पैसे आम्ही पुरवठा शाखेतील अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार या विभागात काम करणार्‍या एका तरुणाकडे दिले; परंतु ती रक्कम त्या तरुणाने कोषागारात भरलीच नाही,’ असा आरोप करत रेशन दुकानदारांनी ही रक्कम भरण्यास नकार दिल्यानंतर हा गैरव्यवहार समोर आला आहे. दुसरीकडे ‘ही रक्कम जमा करा,’ असे आदेश महसूल प्रशासनाने दिल्याने ‘पुढे काय,’ असा प्रश्न रेशन दुकानदारांपुढे उभा राहिला आहे.Shocking! 50 lakh scam in ‘Ananda Shidha’

दिवाळी, गुढीपाडवा व गणेशोत्सव या काळात तालुक्यात एकूण 164 रेशन दुकानदारांना पुरवठा शाखेने ‘आनंदाचा शिधा’ दिला. तीन टप्प्यांमध्ये दिलेल्या या शिध्याची रक्कम जवळपास 50 लाख रुपयांच्या आसपास असून हा शिधा विकल्यानंतर त्याची रक्कम रेशन दुकानदारांनी शासकीय कोषागारात भरणे बंधनकारक आहे. मात्र रेशन दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, पुरवठा शाखेतील एका अधिकार्‍याने तोंडी आदेश दिले होते, की ही रक्कम पुरवठा शाखेत गेल्या सात ते आठ वर्षांपासून ‘कार्यरत’ असलेल्या एका खासगी तरुणाकडे जमा करावी. त्यामुळे आम्ही शिधाविक्रीतून आलेली रक्कम या तरुणाकडे जमा केली. आता आम्ही पुन्हा पैसे भरणार नाही, असा पवित्रा या दुकानदारांनी घेतला आहे. दुसरीकडे महसूल प्रशासनाने रेशन दुकानदारांनी ही रक्कम तातडीने शासनाच्या खात्यात भरावी, असे तोंडी आदेश दिले आहेत.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या विषयावर पुरवठा शाखेत उलटसुलट चर्चा सुरू आहे. आज याच विषयावर सर्व रेशन दुकानदारांनी बैठक घेत ‘आम्ही आमचे पैसे जमा केल्याने पुन्हा पैसे भरणार नाही,’ असा पवित्रा घेतला, तर दोन दिवसांपूर्वी तहसीलदार श्याम वाडकर यांनी रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करत, ज्यांच्याकडे बाकी आहे, त्यांनी ती जमा करावी, असे आदेश दिले आहेत.हा शिधा दुकानदारांना तीन टप्प्यात देण्यात आला असून पहिल्या टप्प्यात दिलेल्या मालाचे पैसे पूर्ण जमा झाले की नाही, हे न पाहताच पुरवठा शाखेने दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यात माल दुकानदारांना कसा दिला, हे समजू शकले नाही. दुसरीकडे रेशन दुकानदारांनी विकलेल्या मालाचे पैसे कोषागारात भरणे बंधनकारक असताना खासगी तरुणाकडे का जमा केले, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. रेशन दुकानदारांनी ही रक्कम भरली नाही, तर महसूल प्रशासन त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. यासंदर्भात पुरवठा अधिकारी ज्योती अकोलकर व या विभागाशी संबंधित अधिकारी संदीप बडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय