अकोले : वैज्ञानिक दृष्टीकोन मानव समजाच्या प्रगतीची पूर्व अट आहे. बुद्धीप्रामाण्यवाद स्वीकारूनच मानवी अस्तित्वाच्या प्रयोजनाची उकल होऊ शकेल. प्रगत मानवी समाज निर्माण करता येईल. वास्तवात मात्र देशात अत्यंत मागास व अंधश्रद्ध विचारांची पेरणी केली जात आहे. द्वेष, कट्टरता व हिंसेच्या आधारे राष्ट्र निर्मितीच्या वल्गना केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत नव्या पिढीने या सर्व घटनांचा, इतिहासाचा व मानव जातीसमोर उभ्या ठाकलेल्या समस्यांच्या सोडवणुकीचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून वेध घेण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन प्रा. विठ्ठलराव शेवाळेे यांनी केले. Scientific approach is a prerequisite for human progress – Prof. Vitthalrao Shewale
स्नेहवर्धिनी प्रतिष्ठान संचलित यशतेज करियर अॅकॅडमीच्या वतीने आयोजित विचार कसा करावा.. अर्थात वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय ? या विषयावर ते बोलत होते. ज्ञान मिळविण्याचे व्यक्ती प्रामाण्यवाद, ग्रंथ प्रामाण्यवाद व बुद्धी प्रामाण्यवाद हे प्रमुख मार्ग आहेत. कोणत्याही बाबीचा अन्वयार्थ काढताना ती बाब पुराव्यांच्या आधारे बुद्धी प्रामाण्यवादी पद्धतीने तपासून घेणे आवश्यक असते. ‘जेव्हढा पुरावा तेवढा विश्वास’ या सूत्राचा अवलंब करूनच आपण आपली मते निश्चित केली पाहिजेत असे यावेळी ते म्हणाले.
स्वातंत्र्य सैनिक गोपाळा धोंडू भांगरे यांच्या स्मृती निमित्त किसान सभा कार्यालयात आयोजित या व्याख्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार व लेखक शांताराम गजे सर यांनी केले. देशात व जगात घडत असलेल्या घटनांचा सरळ परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. अगदी चंद्रावर पाठविलेल्या चांद्रयान मोहिमेतून उपलब्ध होणारी माहिती आपल्या जीवनातील अनेकानेक गोष्टी बदलून टाकण्यासाठी कारणीभूत होत असते.
आपण विज्ञान युगातील मानव आहोत हे सत्य स्वीकारून या सर्व घटनांकडे आपण बुद्धी प्रामाण्यवादी पद्धतीने व वैज्ञानिक दृष्टीकोननाने पाहिले पाहिजे. एकीकडे चंद्रावर यान पाठवायचे व दुसरीकडे चंद्राला राहुने गिळल्यानंतर चंद्र ग्रहण होते ही पुराणातील वांगीही शिजत ठेवायची हे बरोबर नाही. पुरावे व चिकित्सेच्या आधारे पंच ज्ञानेंद्रिय, अनुभव व वैज्ञानिक तर्काच्या आधारे घटना व बाबींचा अन्वयार्थ आपण लावला पाहिजे. प्रगत मानवी समाज निर्माण करण्यासाठी हे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सदाशिव साबळे यांनी केले. अॅकॅडमीचे संचालक एकनाथ सदगीर यांनी व्याख्याते व पाहुण्यांचा परिचय करून दिला. तालुक्यात सध्या जातीय कलह निर्माण करण्याचे प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहेत. जातीच्या अस्मितांना खतपाणी घालून आपले संकुचित राजकारण पुढे घेऊन जात असताना या तालुक्याला लाभलेली जातीय सलोख्याची परंपरा आपण उध्वस्त करत असल्याचे भान काही लोकांना राहिलेले नाही.
तालुक्यातील जागरूक जनतेने अशा समाज विघातक प्रवृतींपासून दूर राहिले पाहिजे. तरुण तालुक्यात तसेच देशात घडत असलेल्या घटनांचे वैज्ञानिक दृष्टीकोनातून विश्लेषण करू लागले तरच अशा समाज विघातक प्रवृतींचा बंदोबस्त होऊ शकेल असे प्रतिपादन नामदेव भांगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. डॉ. अजित नवले, निवृत्त पोलीस अधिकारी श्री. नारायण उगले, राजाराम गंभिरे, शिवराम लहामटे, सुमन विरनक, संगीता साळवे, भीमा मुठे, यांच्या सह अकोले, संगमनेर व राहुरी तालुक्यातील अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.