Friday, May 10, 2024
Homeआरोग्यकोरोनाओळख पडद्यामागील योध्यांची : लॉकडाऊनच्या काळात मदतीचा हात देणाऱ्या समाजसेवक ग्रुपमधील "मिस्टर...

ओळख पडद्यामागील योध्यांची : लॉकडाऊनच्या काळात मदतीचा हात देणाऱ्या समाजसेवक ग्रुपमधील “मिस्टर इंडिया”

( समाजातील वंचित घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कराडमधील ‘समाजसेवक’ ग्रुप सातत्याने काम करत आहे. लॉकडाऊन काळातही असाच मदतीचा हात ते देत आहेत. त्याच ग्रुपमधील सेवानिवृत्त फौजी चंद्रकांत घार्गे यांच्या कार्याबद्दल घेतलेला आढावा )

    मिस्टर इंडिया हा शब्द मुद्दाम वापरला. कारण हा सदस्य कोणाला प्रत्यक्ष दिसलाच नाही पण त्याचे काम लपून नाही राहील.

   चंद्रकांत घार्गे साहेब एक सेवानिवृत्त फौजी आणि संवेदनशील माणूस; हो माणूसच म्हणावे लागेल कारण… मार्च महिन्यात लॉक डाऊन झाला आणि अवघ्या दोन – चार दिवसात साहेबांच्या कडे त्यांच्या ओळखीतील एक महिला आली. अपार्टमेंट मधील जिन्याची साफसफाई करणारी ती महिला घरी खायला काहीच नाही असे सांगत होती. कोणताही विचार न करता त्यांनी तिला स्वतःच्या घरातील गरजू किराणा वस्तू दिल्या. साहेबांचे हे औदार्य त्या महिलेने अजून काही लोकांना सांगितले आणि गरजू लोकांची ये-जा घरी सुरू झाली. करफ्यू मुळे बाहेर पडणे शक्य नव्हते. त्यामुळे घरी असलेला किराणा आणि शेतातील पाच सहा पोती गहू वाटपासाठी कमी पडू लागला.

          शेवटी स्वतःची चारचाकी घेवून दुकानातून किराणा आणणे आणि जो दाराशी आहे. त्याची वेळ काढणे सुरू झाले. आता तर किराणा दुकानदार सुध्दा जास्त प्रमाणात माल देणेची टाळाटाळ करू लागले. मग सुपर मार्केट मधून माल आणणे सुरू झाले. नंतर नंतर पिठाच्या गिरणी बंद राहू लागल्या. आणलेली गहू लोकांना घरच्या चक्की वरती दळून देणे हे काम सुरू झाले. ” साहेब तुम्हाला ‘मंत्रचळ’ झाला आहे का? ”  मी विचारलं’ तेव्हा ते म्हणाले,

   ”ज्या देशवासीयांच्या संरक्षणासाठी आम्ही सीमेवरती दिवसरात्र एक केला; रिटायर झालोय म्हणून त्यांना काय उंदीर घुशी सारखं मारताना बघायचं.” 

         हे एकाकी सुरू असलेले काम एकोप्याने पुढे सुरू राहणे गरजेचे होते. म्हणून समाज सेवक ग्रुप कडून काही रोख रकमेची तरतूद करणेत आली. रक्कम जमा झाली आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  कराड, सैदापुर, विद्यानगर भागातील अत्यावशक सेवा बंद करण्यात आल्या. एक ठराविक रक्कम जमून सुध्दा किराणा दुकान बंद असलेमुळे लोकांची मदत करणेसाठी अडचण निर्माण झाली.  आता तर त्यांच्या स्वतःचा घरचा किराणा सुध्दा संपत आला.  

            कोपर्डे, मसूर, आणि किवळ गावातून गाडीच्या बुट स्पेसमध्ये बसेल एवढा किराणा माल आणावयाची मोहीम सुरू झाली. दिवसातून ३ ते ४ हेलपाटे मारावे तेव्हा कोठे एक दोन वस्तू घरी येऊन पडायच्या, गरजू लोकांचे येणे जाणे सुरू असायचे. त्यांना आश्वासक आणि आधार मिळेल अशी उत्तरे ते देत.

        लॉकडाऊन पूर्वी गाडीची पेट्रोल टाकी फुलं केली होती. पण आता गाडीची भूक भागवणे हे एक नवीन आव्हान होते. त्यातच एकेदिवशी पोलिसांनी गाडी अडवली आणि कर्फ्युमध्ये बाहेर का पडलात अशी विचारणा केली. दंड म्हणून उन्हामध्ये उभा राहणे ही शिक्षा झाली. एक एक आव्हानांना समोर जाणे या संवेदनशील फौजी माणसाला शारीरिक दृष्ट्या नाही, पण मानसिक दृष्ट्या नक्कीच त्रासदायक ठरले असावे. सर्व किराणा उचलून गाडीमध्ये चढवणे आणि उतरवणे, घरी आल्यानंतर व्यवस्थितरित्या वजन करून सुव्यवस्थित पॅकिंग करणे हे काम एका व्यक्तीने करणे आपण कल्पना करू शकतो किती कष्ट असतील?

             एक गोष्ट नक्की की फौजी हा आयुष्यभर फौजीच असतो, तो नेहमी सामान्य देशवासीयांच्या साठी तत्पर असतो. मग ती सीमेवरील असो अथवा आतासारखी कोरोणाजन्य युद्ध स्थिती असो.

          गेली २ महिने समाज सेवक ग्रुपने जे गरजू लोकांसाठी धान्य वाटप केले त्याची सुरुवात चंद्रकांत घार्गे यांच्याकडून झाली. या उपक्रमात आजवर आपल्या सर्वांंकडून जी सेवा झाली त्यामध्ये सिंहाचा वाटा त्यांनी उचलला. त्याबद्दल समाजसेवक ग्रुपमधील सर्वांकडून आपल्या या ‘मिस्टर इंडिया’  सदस्याचे मनपूर्वक आभार.

उदय कदम,

सदस्य समाजसेवक ग्रुप, कराड


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय