Sunday, April 28, 2024
Homeजिल्हापुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा जूनमध्ये

पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा जूनमध्ये


पुणे : 
उच्च शिक्षणाच्या संधींसाठी विद्यार्थ्यांना उशीर होऊ नये, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन सत्र परीक्षा जूनमध्ये घेण्याचे नियोजन केले आहे. या परीक्षेचा संपूर्ण निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर करून विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक कागदपत्रे तातडीने देण्यात येणार आहेत. त्यामुळे अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी विद्यापीठांच्या सत्र परीक्षांबाबत राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या सत्र परीक्षांच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परराज्यात किंवा परदेशात उच्च शिक्षण, संशोधनासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी या परीक्षा प्राधान्याने घेण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरीत वर्षाच्या परीक्षा घेणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

पुणे विद्यापीठाकडून साधारण १० ते १५ मे या कालावधीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. विद्यार्थ्यांना साधारण ३१ मेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर १५ जूनपासून अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. या परीक्षांचा निकाल ३१ जुलैपासून जाहीर होण्यास सुरुवात होईल. कोणतीही अडचण उद्भवली नाही, तर संपूर्ण अभ्यासक्रमांचे निकाल १५ ऑगस्टपर्यत जाहीर होतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना तातडीने गुणपत्रिका; तसेच इतर शैक्षणिक दाखले उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाइन अर्ज भरल्यास परीक्षांचे आयोजन वेळेत होईल. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत सहकार्य केल्यास प्रवेशपत्र देण्यापासून ते वेळापत्रकापर्यतच्या सर्व प्रक्रिया वेळेत होतील. त्यामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या आयोजनाबाबत काळजी करू नये.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय