Sunday, May 19, 2024
Homeआंबेगावपुणे : जुन्नर येथे रविवारी राज्यस्तरीय हिरडा परिषद, हिरडा खरेदी आणि दराबाबत...

पुणे : जुन्नर येथे रविवारी राज्यस्तरीय हिरडा परिषद, हिरडा खरेदी आणि दराबाबत आंदोलनाची रणनिती ठरण्याची शक्यता 

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आयोजन

पुणे : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे राज्यस्तरीय हिरडा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत हिरडा खरेदी आणि दराबाबत आंदोलनाची रणनिती ठरणार आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव,जुन्नर व खेड तालुक्यातील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील नागरिकांचे मुख्य उत्पनाचे साधन असलेल्या, बाळहिरडा या गौणवनउपजाची, खरेदी वर्षानुवर्षे आदिवासी विकास महामंडळ करत असे. परंतु मागील चार वर्षांपासून आदिवासी विकास महामंडळ यांनी, बाळहिरडा खरेदी करणे थांबवले आहे. आदिवासी भागातील, नागरिकांचे मुख्य उत्पनाचे साधन असलेले व नगद रक्कम प्राप्त करून देणारे बाळहिरडा हेच एकमेव साधन या भागातील नागरिकांचे आहे. बाळहिरड्याचे भाव सद्यस्थितीत, अत्यंत कमी झाले असून, यातून प्रचंड मोठे आदिवासी व बिगर आदिवासींचे शोषण सुरू आहे. 

या पार्श्वभूमीवर किसानसभेने व्यापक जनआंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करणेसाठी व आदिवासी आणि बिगर आदिवासी यांची उपजीविका सुनिश्चितीसाठी राज्यस्तरीय

हिरडा परिषद, रविवार दि.१० जुलै २०२२ रोजी जुन्नर शहरात आदिवासी सांस्कृतिक,भवन येथे संपन्न होत आहे. किसान सभेच्या राज्य समितीने या परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेला पुणे, अहमदनगर तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातील हिरडा उत्पादक शेतकरी व किसान सभेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

राज्य शासनाने आदिवासी विकास महामंडळाला बाळहिरडा खरेदी करण्यासाठी आवश्यक तो निधी तत्काळ उपलब्ध करून देवून तातडीने बाळहिरडा खरेदी करावा.व त्यास रास्त दर द्यावा. आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या हितार्थ दीर्घकालीन धोरण ठरवण्यासाठी बाळहिरडा व मोठा हिरडा यांचा अभ्यास करणारी समिती स्थापित करावी. निसर्ग चक्रीवादळात बाळहिरड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यावेळी शासनाने पंचनामे केले होते. परंतु ही नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही, ही नुकसान भरपाई त्वरित मिळावी. हे हिरड्या विषयी मुख्य तीन ठराव मांडले जाणार आहे. याबरोबरच इतर सामाजिक प्रश्नांवर ही ठराव या परिषदेत मांडले आहेत

या हिरडा परिषदेचे उद्घाटक माकपचे डहाणूचे आमदार कॉ. विनोद निकोले करणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणून जुन्नर विधानसभा सदस्य आमदार अतुल बेनके, अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ.अजित नवले, जेष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ.अजित अभ्यंकर, प्रकल्प अधिकारी घोडेगाव चे बळवंत गायकवाड आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी राहुल पाटील, किसान सभेचे राज्य पदाधिकारी कॉ.उमेश देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.

तर या परिषदेचे अध्यक्ष किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष ॲड. नाथा शिंगाडे असणार आहे. या परिषदेचे स्थानिक समन्वय किसान सभा पुणे जिल्हा समितीने केले आहे. या परिषदेला अधिकाधिक संख्येने हिरडा उत्पादक शेतकरी व सजग नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन किसान सभेच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय