Tuesday, January 21, 2025

पुणे : माजी खासदार आढळराव पाटलांची विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचेवर कुरघोडी !

नारायणगाव : पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नारायणगाव व खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. १७ जुलै) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. या कार्यक्रमाचा सुगावा लागताच शुक्रवारी (दि. १६ जुलै) सायंकाळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. एकप्रकारे या माध्यमातून खासदार डॉ. कोल्हे यांच्यावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कुरघोडी केली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना बाह्यवळण रस्त्याच्या श्रेयवादावरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमधील राजकीय वातावरण तापले आहे. नारायणगाव व खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे काम मागील पाच वर्ष प्रलंबित होते. आढळराव पाटील खासदार असताना २०१९ पूर्वी या बाह्यवळणासाठी भूसंपादन करून रस्त्याचे काम सुरू झाले. नारायणगाव बाह्यवळणाचे सुमारे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले असताना ठेकेदार काम सोडून गेला. या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने पुणे नाशिक महामार्गावर वाहतूकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. 

दरम्यान डॉ. अमोल कोल्हे खासदार झाले. रोडवेज सोल्युशन कंपनीला हे काम देण्यात आले. कोरोनामुळे एक वर्ष काम पुन्हा बंद झाले. अनेक अडथळे पार करत नारायणगाव व खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झाले. त्या नुसार शनिवारी (दि.१७) सकाळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते व आमदार दिलीप मोहिते, अतुल बेनके, बाजार समितीचे सभापती संजय काळे, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांचे उपस्थितीत उद्घाटन करण्याचे निश्चित झाले.

निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री यांचे फोटो होते. या बाबतची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र, या रस्त्याच्या मंजुरीसाठी विशेष योगदान असलेले माजी खासदार आढळराव पाटील यांचा नामोल्लेख निमंत्रण पत्रिकेत टाळण्यात आल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले. सोशल मीडियावर खासदार डॉ . कोल्हे यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. त्या नंतर वेगवान राजकीय घडामोडी घडून अखेर सायंकाळी माजी खासदार आढळराव पाटील यांनी रस्त्याचे उद्घाटन केले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles