पिंपरी चिंचवड : सरकार रुपी राक्षसाने सध्या सामान्य माणसाचे जगणे कठीण करून टाकले आहे. सबका साथ सबका विकास ही घोषणा फोल ठरली आहे. भांडवलदारांना वाढवण्यासाठी राज्य कारभार चालू आहे. सध्या नोकरभरती बंद आहे आणि अशा परिस्थितीत वेदांत फाक्सकानचा प्रकल्प गुजरात मध्ये हलवण्यात आला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण थोपटे यांनी केली आहे. ते तळवडे रुपी नगर येथे लोकजागर ग्रुप आयोजित महागाई विरोधी अभियान जाहीर सभेत बोलत होते.
लोकजागर ग्रुपचे अध्यक्ष डॉ. सुरेश बेरी यांनी आपल्या भाषणात म्हणाले, “या महागाईला मुख्यतः केंद्र सरकार जबाबदार आहे. आपल्या रोजच्या वापरातील वस्तूंवर सरकारने जबरदस्त विक्री व सेवा कर लादला आहे आणि तो दरवर्षी ते वाढवीत आहेत. सरकारचे कर हे महागाईचे मुख्य कारण आहे.
ते पुढे म्हणाले, “देशातल्या मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशानेही महागाई वाढतेय. हा पैसा मालाची साठेबाजी करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे मालाच्या किंमती वाढतात. चलनवाढीमुळे ही भाववाढ होते. रुपयाची किंमत घसरल्याने आयात मालाची किंमत वाढते. हे सगळे होत असताना बड्या उद्योग पतींनी संपत्ती मात्र बेसुमार वाढत आहे. त्यांना कर्जमाफी मिळत आहे. ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी जनतेने आता मोठे आंदोलन उभे केले पाहिजे, असे डॉ.सुरेश बेरी म्हणाले.
या सभेचे आयोजन सुधीर मुरुडकर, गोकुळ बंगाळ, बी एन घस्ते, विकास सूर्यवंशी, प्रमोद घनवट, जमीर मुल्ला, एस के मालुसरे यांनी परिश्रम घेतले. महागाई विरोधी अभियान गेले महिनाभर चालू आहे. आतापर्यंत दीड हजार पत्रके वाटून झाली. लोकजागर ग्रुप तर्फे कोपरा सभांना सुरुवात झाली आहे. काल रुपी नगर येथे सभा झाली. या सभेत सचिन देसाई याची भाषणे झाली.
संपादन – क्रांतिकुमार कडुलकर