पिंपरी चिंचवड : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅसच्या किंंमतीत मोठी वाढ केली आहे. या भरमसाठ दरवाढीला विरोध करत पिंपरी- चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने आज (मंगळवारी) अनोखे फलक आंदोलन करण्यात आले.
चिंचवड चौकातील पेट्रोल पंपालगतच मोदी यांचा फलकाद्वारे उपाहासात्मक निषेध करण्यात आला. युवक काँग्रेसकडून उभारण्यात आलेल्या या फ्लेक्सवर महागाईच्या या भयानक सद्यपरिस्थितीवर मोदी यांचे मौन, डोळेझाक व दुर्लक्ष याची तुलना करत निषेध केला.
युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, देश कोरोनाच्या संकटातून सावरतोय. तोच लगेच भाजपाच्या मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ करत देशातील जनतेला नव्या संकटात टाकले आहे.
पेट्रोल, डिझेलच्या दराने जवळपास शंभरी गाठल्याने सर्वसामान्यांना आधीच फटका बसला. त्यात आता एलपीजी सिलेंडर दरात सोमवारी 25 रूपयांनी वाढ करण्यात आली. आता 14.2 किलोचा गॅस सिलेंडरचा दर प्रति सिलेंडर 125 रूपयांनी वाढला. आज सिलेंडर 819 रुपये आहे.