पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : बोऱ्हाडेवाडी येथील शिवरोडवर बालाजी विश्व व के.के.कायझान सोसायटी समोरील तसेच या रोडवरील पडलेल्या मोठ्या मोठ्या खड्यात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना यामधून प्रवास करणे कठीण जात असल्याने हे मोठे मोठे खड्डे बुजवून घ्यावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना चिखली-मोशी-चऱ्होली पिंपरी-चिंचवड हाउंसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी निवेदन दिले आहे. PCMC
बोऱ्हाडेवाडी मोशी येथील 18 मीटर शिवरोडवर वूड्स विले फेज -1 सोसायटीपासून बालाजी विश्व सोसायटी पर्यंत खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. सद्या जोरात पाऊस चालू असल्याने या खड्ड्यात पूर्णपणे पाणी साचलेले आहे. बालाजी विश्व सोसायटी आणि के.के.कायझन सोसायटी समोर तर खूप मोठे 10×10 चे खड्डे पडून त्यामधे पावसाचे पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरूप आलेले आहे. त्यामुळे येथून नागरिकांना विशेषतः महिला भगिनी,लहान मुले व वयोवृद्ध नागरिक यांना प्रवास करने कठीण जात आहे. या रोडवर एक लहान मुलांची शाळा देखील आहे आणि या शाळेच्या समोरच हा मोठा खड्डा आहे. त्यामुळे शाळेत येणाऱ्या लहान मुलांना व पालकांना याचा खूप त्रास होत आहे. त्यामुळे या 18 मीटर रोडवरील सर्व खड्डे बुजवून घेण्याच्या सूचना देऊन हे खड्डे त्वरित बुजून घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सांगळे यांनी केली आहे.
रस्त्याची कामे निकृष्ठ दर्जाची – संजीवन सांगळे
चिखली-मोशी भागातील बऱ्याच रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत .आमच्या वूड्स विले फेज -1 सोसायटी पासून देहूरोड पर्यंत असणाऱ्या शिवरोडला तर बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि त्यामधे पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरूप आलेले आहे.मागील वर्षीच आमच्या फेडरेशनच्या पाठपुराव्याने या रोडचे काम झालेले आहे .पण हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. अशा ठेकेदाराला परत काम देताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विचार करावा आणि नागरिकांच्या कररुपी पैशाची उधळपट्टी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन चे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले .