Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणफासेपारधी - एड.वसंत नलवडे

फासेपारधी – एड.वसंत नलवडे

           मी अगदी लहान होतो आणि त्याकाळी बालवाडी, अंगणवाडी, माॅन्टेसरी, के.जी वैगेरे नसल्याने घरीच होतो. संध्याकाळी आई शेतातून येण्याची घरासमोरील शाळेच्या मैदानात वाट पाहत होतो. त्या मैदानापलिकडे एक ओढा आहे. तेव्हा तेथे चांगली झाडी होती. काही वेळाने आई दिसली, तिच्या डोक्यावर सरपणाचा बिंडा आणि सोबत शेरडी व करडे होती. बराच वेळ झाला तरी आई त्या ओढ्यातून अलीकडे आली नाही. जेव्हा ती आली तेव्हा तिचे सोबत एक फासेपारधी महिला होती. आम्हाला वाटले त्या बाईनेच आईला काही तरी केले असेल.

           जेव्हा त्या दोघी घरी आल्या तेव्हा आईने वहिनींना पाणी गरम करण्यासाठी सांगितले. आई वहिनींना सांगत होती अग, ही बया अडली व्हती (बाळंतपणा पुर्वीची स्थिती) आणि एकटीच इवळत पडली व्हती त्या वढ्यात झाडाच्या आडोशाला,  मग माऊलीची सुटका केली आणि तिला घरी आणलीय. आता तिच्या बाळाला माखू आणि तिला अंघोळ घालून, पोटभर खायला देऊन पाठवू. त्यावेळी आम्हाला एवढेच कळाले की ती फासेपारधी बाई बांळतीन झाली होती म्हणजे तिला बाळ झाले. ती बाई म्हटली, ए माई राहु दे आंघुळ पण मला पोटाला दे, लय भुखा लागल्यात. पोटभर जेवली आणि निघून गेली.

            सातारा येथील कलेक्टर कार्यालयासमोर फासेपारधी लोकांनी ‘धरणे’ आंदोलन केले होते. तीन दिवसांनंतर तेथेच त्यांचे पैकी एका महिलेच्या नवजात शिशूला मरण आले आणि ते इवलेसे कलेवर मांडीवर घेऊन ती माय रात्रभर बसून होती. ते लोक जागा सोडायला तयार नव्हते. आम्ही काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंत्यसंस्कार (खरे तर विल्हेवाट) साठी आर्थिक मदत केली. त्यातून त्यांना पोटभर अन्न मिळाले.

            असेच एकदा ज्वारीचे शेतात गेलो तर दोन फासेपारधी महिला कणसे कापून झोळीत ठेवत होत्या. माझ्या भावाने त्यांना हटकले तेव्हा त्यांनीच दंगा केला आणि आम्हालाच विचारले, चोरी नाय करायची तर आमी पोटं कसं भरणार?त्या प्रश्नाचे आमचे कडे उत्तर नव्हते.

          माणसाच्या अन्न,वस्त्र आणि निवारा या तीन मुलभूत गरजा आहेत. पण फासेपारधी समाज असा आहे की त्याची एकच गरज आहे ती म्हणजे अन्न. आजही त्यांचे पैकी अनेकांची नागरिक म्हणून नोंद झाली नसावी. 

एड. वसंत नलावडे,

सातारा.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय