Monday, May 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडNashik:व्हिडिओ न्यूज:युवकांच्या सामर्थ्यावर देशाची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Nashik:व्हिडिओ न्यूज:युवकांच्या सामर्थ्यावर देशाची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

नाशिक, दि. 12  : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळातील आजची तरुण पिढी नशीबवान आहे. या पिढीला वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. या पिढीला सामर्थ्यवान आणि कौशल्याधारित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या युवकांच्या सामर्थ्यावरच भारताची जगातील आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरू आहे. अमृत काळातील पुढील 25 वर्षांच्या कालावधीत परिश्रम घेत तरुणांनी @२०४७ पर्यंत विकसित भारत घडवित इतिहास निर्माण करावा, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.


केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा विभाग व राज्य शासनातर्फे नाशिक येथे आजपासून सुरू झालेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते तपोवन मैदानावर झाले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय माहिती व प्रसारण, युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, माणिकराव कोकाटे, दिलीप बोरसे, दिलीपराव बनकर, प्रा. देवयानी फरांदे, सरोज अहिरे, डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे,  नितीन पवार, ॲड. राहुल ढिकले आदी उपस्थित होते.

प्रारंभी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविध राज्यांच्या संघांनी पथसंचलन केले. तसेच ‘विकसित भारत @2047- युवा के लिए- युवा का द्वारा’ या संकल्पनेवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.


प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद यांनी युवकांची ताकद ओळखली होती. ते युवकांचे प्रेरणास्थान आहेत. भारतीय युवकांचे परिश्रम, सामर्थ्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. याच शक्तीच्या सामर्थ्यावर भारताची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे. याच युवकांच्या बळावर भारत मॅन्युफॅक्चरिंगचे हब तयार होत आहे. यातूनच तरुणांना इतिहास घडविण्याची संधी मिळणार आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या पिढीने देशासाठी जीवन अर्पण केले. आताच्या पिढीने पुढील 25 वर्षांचा काळ कर्तव्य काळ मानत विकसित भारताच्या निर्मितीसाठी द्यावा, त्यासाठी युवकांनी संकल्प करावा. जेणेकरून भारत जगात नव्या उंचीपर्यंत पोहोचू शकेल. त्यासाठी ‘मेरा भारत- युवा भारत’ संघटन सुरू करण्यात आले आहे. त्यावर आतापर्यंत एक कोटी पेक्षा जास्त युवक- युवतींनी नोंदणी केली आहे.


आधुनिक भारत घडविण्यासाठी तरुणांच्या मार्गात येणारे विविध अडथळे दूर करण्यात येत आहे. कौशल्‍य विकासावर आधारित राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलात येत आहे. त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. आयआयटी, एनआयटी महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. युवकांमधील कौशल्य विकासासाठी पाश्चात्य देशांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले असून त्यांचाही लाभ होत आहे. महामार्गांची निर्मिती, वंदे भारत रेल्वे, विमानतळांचाही विकास करण्यात येत आहे. चंद्रयान, आदित्य एल 1 च्या यशाने जगाला भुरळ पडली आहे. गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने युवकांना नवनवीन संधी दिली आहे. भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी 18 वर्षांवरील तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून मतदान करावे, असेही आवाहन प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय