Saturday, April 27, 2024
Homeजिल्हामुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहास छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे नाव द्या...

मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहास छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे नाव द्या – SFI ची कुलगुरूंकडे मागणी

मुंबई : मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतिगृहास छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे नाव नाकारून राज्यपाल यांच्या शिफारशीवरून वि. दा. सावरकर यांचे नाव देण्याचे विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाने निर्णय घेतला. या निर्णयाचा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटी तीव्र विरोध केले आहे. एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटीने कुलगुरूंना ईमेलद्वारे निवेदन देऊन विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतिगृहास छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली. यापूर्वी कुलगुरूंची भेट घेऊन याबाबतचे निवेदन एसएफआय मुंबई कमिटीनेही दिले आहे.

दिलेल्या निवेदनात एसएफआयने म्हटले आहे, की छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य महान व अतुलनीय आहे. समाजाच्या शेवटच्या घटकातील विद्यार्थी शिक्षणात आला पाहिजे, तो टिकला पाहिजे आणि त्याची शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे. यासाठी शाहू महाराजांनी प्रचंड कार्य केले. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य दैदिप्यमान आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी महाराजांनी वसतिगृहे सुरु केली. त्यांनी अनेक शाळा उभारल्या. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा आदेश काढला. मुलींना मोफत उच्च शिक्षणाची सुरूवात केली. याबरोबर महाराजांनी प्रौढ शिक्षण देखील सुरू केले. त्यांनी आपल्या संस्थानात शिक्षणासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. संस्थानातील दीन-दलित, सर्वसामान्य, गोरगरीब, बहुजन, अल्पसंख्यांक या सर्वांना महाराजांनी त्यांच्या कुवतीनुसार, क्षमतेनुसार मिळेल तेथे संधी निर्माण करून महात्मा फुले व तत्कालीन समाज सुधारकांचा वारसा पुढे नेण्याचे बहुमुल्य कार्य केले.

असे असताना, शिक्षण क्षेत्रातील कार्याचा जरासाही संबंध नसणाऱ्या व स्वातंत्र्य आंदोलनात ब्रिटिशांकडे माफीनामा देणाऱ्या वि. दा. सावरकर यांचे नाव विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला देणे उचित ठरणारे नाही, अशी ठाम भूमिका एसएफआयने घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचेच नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी एसएफआय ची असल्याचे राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड, राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय