जुन्नर (हितेंद्र गांधी) : जुन्नर शहरातील तीन विद्यार्थी सोमवारी (दि. २८) युक्रेनची सीमा पार करून रोमानियामध्ये सुखरूप पोहचले आहेत. युक्रेममधील सततचे वाजणारे सायरन, उरात धडकी भरविणाऱ्या बातम्या-व्हिडीओ आणि कधीही काहीही घडू शकते ही भीती, ह्या भयाण परिस्थितीतुन हे विद्यार्थी बाहेर पडले आहेत. यावेळी या विद्यार्थ्यांनी आपल्या घाबरलेल्या पालकांना “डोन्ट वरी, अभी हम बिलकुल सेफ हो गये है..” असा दिलासादायक मेसेज पाठवला आहे.
अक्षद रुपेश दुबे, मंदिरा संजय खत्री आणि मलाईका रणजित चव्हाण अशी या तीन विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे विद्यार्थी युक्रेनमधीन टर्नोपिल शहरात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. या तिघांसह जिल्ह्यातील सुमारे १०० विद्यार्थी या युक्रेन-रशिया युद्धात अडकले होते. २६ तारखेला या युद्धाची तीव्रता वाढल्यावर भारतीय दूतावासाने या विद्यार्थ्यांना महाविद्यालय सोडून रोमानिया, पोलंड किंवा हंगेरीच्या सीमेजवळ जाण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार विद्यार्थ्यांनी बसेस ठरवून सीमारेषा गाठली. येथे देश सोडणाऱ्यांच्या प्रचंड गर्दीमुळे विद्यार्थ्यांना सुमारे ४८ तास ताटकळत थांबावे लागले.
‘कच्चा बदाम’ गाणे गाऊन रातोरात प्रसिध्द झालेले भुबन बड्याकर यांचा अपघात
दरम्यान, युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १८ हजार असल्याचे सांगितले जात आहे. येथील सोयीसुविधा, सुसज्ज महाविद्यालये आणि भारताच्या तुलनेत असलेली अल्प फी यामुळे पालक युक्रेनला पसंती देतात. भारतातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात चांगले मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांचा एमबीबीएसच्या शिक्षणासाठीचा खर्च एक- दीड कोटींच्या घरात जातो. त्या तुलनेने युक्रेनमध्ये फी, हॉस्टेल-जेवणाचा खर्च तसेच जाण्यायेण्याचे हवाई प्रवासभाडे पाहता पाच वर्षांत केवळ ३०-३५ लाखांच्या घरात रक्कम खर्च होते. त्यामुळे भारतात वैद्यकीय शिक्षण माफक दरात व्हावे, अशी पालकांची अपेक्षा आहे.
दरम्यान हे विद्यार्थी पुढील तीन-चार दिवसांत घरी पोहचतील, असे दूतावसाने सांगितले आहे. त्यानंतर पुढील शिक्षणाचे काय? हा पालकांपुढे यक्ष प्रश्न आहे. त्यांचे शैक्षणिक वर्ष व त्यांची भरलेली फी वाया जाणार का? हे प्रश्न सध्या अनुत्तरितच आहेत.
मृदा आरोग्य कार्ड योजना 2022, वाचा योजनेची वैशिष्टे !