Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र जनभूमी विशेष : जगाला "युद्ध' नको "बुद्ध' हवा

महाराष्ट्र जनभूमी विशेष : जगाला “युद्ध’ नको “बुद्ध’ हवा

“युद्ध नको बुद्ध हवा’ असे जगाने मान्य केले आहे. तथागताच्या शांतीच्या संदेशाची आजही जगाला गरज आहे. आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागतांचे तत्त्वज्ञान कृतीत आणूया.जो धम्म समतेवर आणि मानवतेवर आधारित आहे, माणूस हा केंद्रबिंदू असून माणसाला महत्त्वाचे स्थान आहे, जो धम्म विज्ञाननिष्ठ आणि शांतीच्या मार्गाचा आहे अशा धम्माचे संस्थापक तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा आज जन्मदिन. देवदह आणि कपिलवस्तू या दोन नगरांच्या सीमेवर एक सुंदर बाग आहे लुंबिनी. या लुंबिनी वनात एका फुलोरा आलेल्या शालवृक्षाखाली इ.स. 563 मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला.

त्यांचे विचार आणि तत्त्वज्ञान सर्व मानवजातीला क्रांतिकारी उपदेश आहेत. बुद्ध म्हणतात, मन घडविते तसा मनुष्य होतो. मनाला सत्याचा शोध करायला लावला पाहिजे. मनुष्याच्या सर्व व्यवहारांचे उगमस्थान मन आहे. मनुष्य जर दुष्ट चित्ताने बोलेल किंवा वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करते त्याप्रमाणे दुःख अशा दुष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते. मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्याबरोबरच असते त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्याबरोबर राहते. मन हे चंचल आहे. बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र आणि सरळ करतो. मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्‍तीचे प्रमुख आहे. प्रत्येक गोष्ट माणसाने आपल्या बुद्धीच्या पातळीवर घासून पाहावी आणि स्वानुभवांतून पटली तरच त्या गोष्टीचा स्वीकार करावा.


सद्यःवर्तमान जीवनात मागच्या जन्माचा काडीमात्र संबंध नाही. याविषयी बुद्ध म्हणतात- माणसाची स्थिती आनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते. पूज्य माणसांनो, तुम्हांला पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हास माहीत आहे काय? गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे काय? उत्तर साहजिकच “नाही’ असेच आहे. परंतु एखादी व्यक्‍ती गरीब कुळात जन्मली तर तिचे कारण गतजन्माचे दुष्कर्म आणि एखादी व्यक्‍ती श्रीमंताच्या घरात जन्मली तर मागच्या जन्माचे सत्कर्म, असे लोक अंधपणाने समजतात. बुद्ध म्हणतात, ज्ञान म्हणजे प्रकाश. ज्ञानमार्ग हा सगळ्यांना मोकळा असला पाहिजे मग तो पुरुष असो अथवा स्त्री.

अहिंसेबाबत बुद्ध म्हणतात, अहिंसा म्हणजे जीवहत्या न करणे. करुणा आणि मैत्री या दोहोंशी अहिंसेचा जवळचा संबंध आहे. सर्व प्राणिमात्रावर प्रेम करा, म्हणजे तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही. कोणी भिक्षा म्हणून मांस देऊ केले तर ते खाऊ नये. बुद्ध हिंसेच्या विरुद्ध होते. ते न्यायाच्या बाजूने होते. बुद्ध म्हणतात, जगात सर्वत्र दुःखच दुःख भरलेले आहे. इच्छेप्रमाणे न होणे किंवा न मिळणे हेदेखील दुःख होय. जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू ही सर्व दुःखे होत. तृष्णा दुःखाची जननी आहे. तृष्णा म्हणजे हवेहवेसे वाटणे. दुःख थोपविता येते. तृष्णेचा नाश म्हणजे दुःखाचा नाश. दुःख निवारण्याच्या उपायांत माणसाकडे अंधविश्‍वासापासून मुक्‍त असलेली दृष्टी असली पाहिजे. बुद्धिमान माणसाला योग्य असे उच्च विचार असले पाहिजेत. सत्ययुक्‍त दयेने भरलेली आणि निष्कपट असलेली वाणी असली पाहिजे. शांत, प्रामाणिक आणि शुद्ध असलेले कर्म केले पाहिजे. कोणालाही दुःख न देणारी आणि प्रामाणिक अशी उपजीविका असली पाहिजे. स्वत:ला वळण लावण्याचा आणि स्वतःवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


मन नेहमी जागृत आणि सावध ठेवले पाहिजे आणि जीवनातील सत्याविषयी सखोल चिंतन आणि मनन केले पाहिजे. म्हणजेच दुःख निवारणासाठी बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब प्रत्येक माणसाने केला पाहिजे. अष्टांगिक मार्गात प्रत्येक माणसाजवळ सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मान्त, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे गुण असले पाहिजेत. बुद्ध म्हणतात, माणसाने मन हे नेहमी जागृत ठेवले पाहिजे. बुद्ध तत्त्वज्ञानात असे म्हटले आहे की, घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे कारण असते. प्रत्येक कारण हे मानवी अथवा प्राकृतिक कारणांचा परिणाम आहे. दैवी चमत्कृतीवादाचे खंडण करण्यात भगवान बुद्धांचे तीन हेतू होत- पहिला हेतू माणसाला बुद्धिवादी बनविणे. दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रपूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. तिसरा हेतू ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगमस्थानच नष्ट करणे. म्हणजेच बुद्धांचा धम्म हा विज्ञाननिष्ठ आहे. विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून माणसाने वैज्ञानिक निकषांवर विसंबले पाहिजे.

मुर्खाच्या संगतीपासून दूर राहणे, पंडितांची संगती करणे आणि पूज्य जनांची पूजा करणे ही उत्तम मंगले होत. पुष्कळशी विद्या शिकणे, कला शिकणे, सद्‌वर्तनाची सवय लावणे, समयोचित भाषणे करणे, आई-बापांची सेवा करणे, व्यवस्थितपणे कर्मे करणे, मद्यपानाविषयी मनाचा संयम करणे, सत्पुरुषांचा गौरव करणे, नम्रभावाने वागणे, संतुष्ट असणे, कृतज्ञ असणे, गोड बोलणे ही सर्व उत्तम मंगले होत. जगण्याचा मार्ग दाखविणारा हा धम्म म्हणजे जीवनदीप आणि मार्गदीपच आहे. बुद्ध तत्त्वज्ञानात असे म्हटले आहे, ज्याप्रमाणे गुराखी आपल्या काठीने आपली गुरे गोठ्याकडे हाकीत नेतो त्याप्रमाणे वय आणि मृत्यू माणसाचे जीवन हाकीत असतात. ज्याला झोप येत नाही त्याला रात्र लांबलचक वाटते, जो दमलेला असतो त्याला थोडे अंतरही कंटाळवाणे वाटते आणि ज्याला सत्य धर्म ठाऊक नसतो त्याला जीवन हे प्रदीर्घ वाटते. जे मन विचार करीत नाही त्या मनात विकार शिरल्याशिवाय राहणार नाहीत. बिनशाकारलेल्या घरात जसे पाणी प्रवेश करते, तसे हे आहे.

सर्व माणसांना शिक्षेची भीती वाटते. मृत्यूची भीती वाटते, तुम्हीही तसेच आहात हे लक्षात ठेवा. कोणाचीही हत्या करू नका. बुद्धांनी जगातील सर्व मानवजातीला शांतीचा, समतेचा, मानवतेचा संदेश दिला. प्रकाशाने देदीप्यमान तेज ज्यांनी अखिल मानवजातीला दिले ते करुणासागर, करुणेचं लेणं तथागत बुद्ध होत.


प्रवीण धांडोरे (अभ्यासक आणि मुक्त पत्रकार )

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय