कोल्हापूर / यश रुकडीकर : सध्या हातातून मोबाईल हिसकावणे, चैन – मंगळसूत्र पळविणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. असा प्रकार कोल्हापूर शहरात घडला. हातातून मोबाईल हिसकावून पळविणाऱ्या चोरांचा शाहूपुरी पोलिसांनी तत्परतेने शोध घेत अटक केली.
कोमल मंगेश कोकरे ह्या वर्धन हॉस्पिटल शाहूपुरी येथे नोकरी करतात. काम संपवून घरी फोनवर बोलत जात असताना शहाजी लॉ कॉलेज चौकात होंडा मोटार सायकलवरून येणाऱ्या तिघांपैकी एकाने त्यांच्या हातातील फोन हिसकावुन नेला. त्याबद्दलची तक्रार कोमल कोकरे यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे दिली होती.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत शाहूपुरी पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित सूरज उमेंद्र शिरोलीकर (वय 20, रा. विचारेमाळ,कोल्हापूर), आकाश रमेश चोपडे (वय २४, रा. पोर्ले तर्फ ठाणे ता.पन्हाळ,कोल्हापूर) व प्रशांत बबन पाटील (वय २३, रा. केर्ली ता.करवीर, जि.कोल्हापूर) या तिघांना अटक करून त्यांच्याकडून सॅमसंग कंपनीचा १५, ००० रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई शाहूपुरी पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले, ऋषिकेश पवार, युवराज पाटील, मिलिंद बांगर, लखन पाटील, शुभम संकपाळ, सागर माने यांनी केली आहे.