पिंपरी-चिंचवडमध्ये मंडलनिहाय कार्यक्रम
पिंपरी चिंचवड : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा बहुमताने विजयानिमित्ताने पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे शहरात मंडलनिहाय जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, माजी महापौर उषा ढोरे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, प्रदेश सचिव अमित गोरखे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे यांच्यासह पदाधिकारी, सर्व मंडल अध्यक्ष, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, देशातील आदिवासी बांधवांसाठी आजचा दिवस सुवर्णक्षण आहे. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या आदिवासी संथाल समाजातील एक महिला देशाच्या सर्वोच्चपदावर विराजमान होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्व घटकांना सोबत घेवून त्यांच्या प्रगतीचा ध्यास कायम ठेवला आहे.
शहरभर भाजपाचा जल्लोष
निगडी – चिखली मंडलाच्या वतीने केएसबी चौक, चिंचवड येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भोसरी – चऱ्होली मंडलाच्या वतीने पीएमटी चौक भोसरी येथे जल्लोष करण्यात आला. त्यानंतर पिंपरी- दापोडी मंडलातर्फे संत तुकाराम मंदिर, प्राधिकरण – चिंचवड स्टेशन मंडलातर्फे टिळक चौक, निगडी येथे तसेच चिंचवड गाव – किवळे मंडलातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाल्हेकरवाडी आणि सांगवी – काळेवाडी मंडलातर्फे पंचनाथ चौक, काळेवाडी येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
– क्रांतिकुमार कडुलकर