Saturday, April 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडहॉकर्स घोटाळ्याची चौकशी करा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू : बाबा कांबळे

हॉकर्स घोटाळ्याची चौकशी करा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू : बाबा कांबळे

मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली रिक्षा चालक, टपरी धारकांची सभा

भक्तीशक्ती शिवशक्ती भीमशक्ती रिक्षा स्टँडचे उद्घाटन

पिंपरी चिंचवड
: महापालिकेने निगडी उड्डाणपुलाखालील रिक्षा थांबासाठी असणारी जागा हॉकर्ससाठी आरक्षित केली आहे. या बरोबरच चिखली घरकुल, कृष्णानगर भाजीमंडई आणि निगडी उड्डाणपुलाखाली हॉकर्स झोन मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाला आहे. या घोटाळ्याची चौकशी करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा महाराष्ट्र रिक्षा पंचायत तसेच टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला.

हॉकर्ससाठी 20 टक्के जागा एससी प्रवर्गासाठी तर 80 टक्के जागा स्थानिक भूमिपुत्रांना देण्यात यावेत, असा नियम आहे. मात्र, त्याचेही अधिकाऱ्यांनी उल्लंघन केले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर ऍट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. परंतु ,गुन्हा दाखल झाला नाही यामुळे मागासवर्गीय आयोगांकडे तक्रार करणार असल्याचे प्रतिपादन बाबा कांबळे यांनी केले.

निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली रिक्षा चालक मालक, टपरी धारकांची सभा पार पडली. या वेळी बाबा कांबळे बोलत होते. या वेळी भक्तीशक्ती शिवशक्ती भीमशक्ती रिक्षा स्टँडचे सचिन काळभोर, रज्जाक सोलापुरे, राजू शेख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी दिवान आप्पा, रामभाऊ वाघमारे, समाधान मगर आदी उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले की, महापालिका प्रशासनाने रिक्षा चालकांना व टपरी पथारी हातगाडी धारकांना दुजाभावाची वागणूक देऊ नये. हे संयमी आहेत. मात्र त्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. अन्यथा आपल्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन छेडायला देखील हे कमी पडत नाहीत. निगडी पवळे ब्रीज येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोणालाही विश्वासात न घेता, तसेच शहरातील सर्वात मोठी संघटना टपरी, पथारी, हातगाडी पंचायत या संघटनेला विश्वासात न घेता परस्पर लकी ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये बोगस व जे खरे व्यवसाय करत नाहीत अशा लोकांना गाळे वाटप करण्यात आले आहेत. ज्यांना गाळे वाटप झाले ते सर्वजण परप्रांतीय असून महाराष्ट्रातील रहिवासी नाहीत. महाराष्ट्रातील भूमिपुत्र स्थानिक रहिवासी त्यांना 80 टक्के प्राधान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु प्रत्यक्ष मात्र तसे झाले नाही. मागासवर्गीयांना आरक्षण दिले नाही. अपंग, विधवा यांना देखील आरक्षण दिले नाही. जातीय भावनेतून मुद्दाम आरक्षण दिले नसल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

तसेच आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून भेदभाव केला आहे.यामुळे या प्रकरणाची चौकशी करून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बाबा कांबळे यांनी केली. खरे व्यावसायिक असणाऱ्या सुमारे 80 टपरी,पथारी व हातगाडी धारकांना जागा मिळाली नाही. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार सुरू आहेत. संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक महिलांवर अन्याय करत आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. हे अन्याय थांबवावेत. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर आयुक्तांनी कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर टपरी, पथारी, हातगाडी पंचायतच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू असा, इशारा बाबा कांबळे यांनी दिला.

सभेनंतर निगडी पोलीस स्टेशन व आ व फ क्षेत्रीय अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी सचिन शिंदे, हैदरभाई शेख, नवनाथ शेलार, सलिम मुकरताल, अविनाश साळवे, सुरज हातागळे, इनाम विजापूरे,अरिफ शेख, प्रबुध्द कांबळे यांनी परिश्रम घेतले.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय